गोल्डन आय न्यूज नेटवर्क
चेहऱ्यावर हास्य फुलवितो तो खरा कलाकार : डॉ. न. म. जोशी !!
रमाई महोत्सवात आडकर फौंडेशनच्या सहकार्याने बंडा जोशी यांचा सत्कार !
पुणे : रडवणे सोपे असते; पण एखाद्याला भूक विसरायला लावून त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कठीण काम करणारा खरा कलाकार असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवात डॉ. जोशी यांच्या हस्ते एकपात्री कलाकार बंडा जोशी यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत हाते.
महामाता रमाई महोत्सवात आयोजित सत्कार सोहळ्यात (डावीकडून) सचिन ईटकर, ॲड. प्रमोद आडकर, बंडा जोशी, डॉ. न. म. जोशी, लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड.
जोशी यांच्या एकपात्री कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आडकर फौंडेशनच्या सहकार्याने मंगळवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सव महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, वाडिया कॉलेज समोर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी मंत्री रमेश बागवे, लता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. जोशी पुढे म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने महामाता रमामाई यांच्या चरणी बसण्याचे भाग्य लाभले आणि माझ्या हस्ते एका कलावंताचा सत्कार करण्यात येत आहे यात धन्यता मानतो. वयाच्या 16व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्याचे लाभलेले भाग्य आणि त्यांनी दिलेल्या पैशातून केलेली पुस्तक खरेदी या विषयीच्या आठवणी डॉ. जोशी यांनी या वेळी सांगितल्या. रसिकांना खळखळून हसवत रहा अशा शुभेच्छा त्यांनी बंडा जोशी यांना दिल्या.
सुरुवातीस महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील संकल्पना विशद केली.
सत्काराला उत्तर देताना बंडा जोशी म्हणाले, रमाई महोत्सवात होत असलेला सत्कार म्हणजे रमामाई यांचा आशीर्वादच आहे. भविष्यातही रसिकांना हसवत राहणार असेही त्यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यानंतर त्यांचा ‘हास्यपंचमी’ या कार्यक्रम झाला.
रमेश बागवे या वेळी म्हणाले, महोत्सवाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचतात आणि त्यातून समाज घडत जातो.
आभार महोत्सवाचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत लता राजगुरू यांनी केले.
जाहिरात