Marathi FM Radio
Saturday, July 19, 2025

पद्मश्री कै. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘माणिकस्मृती’ स्वरांजली कार्यक्रम

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

‘उत्तुंग’च्या त्रिदशकपूर्ती सोहळ्याचे २५ मे रोजी आयोजन

पद्मश्री कै. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘माणिकस्मृती’ स्वरांजली कार्यक्रम

डॉ. आनंद नाडकर्णी, विद्याधर निमकर, डॉ. श्रीरंग गोडबोले आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा ‘उत्तुंग’ पुरस्काराने होणार गौरव

Advertisement

पुणे : पुण्यासह मुंबई, ठाणे येथे संगीत, नाट्य, नृत्य, गायन, वादन, लेखन, कीर्तन, प्रवचन, विचारमंथन अशा ललित कलांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन आणि समाज प्रबोधनाच्या उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट या संस्थेचा ३०वा वर्षपूर्ती आनंदोत्‍सव आणि उत्तुंग वार्षिक सन्मान प्रदान समारंभ रविवार, दि. २५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने ‘माणिकस्मृती’ हा स्वरांजली कार्यक्रम आणि उत्तुंग सन्मान पुरस्कांचे वितरण होणार आहे.

Advertisement

Advertisement

कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या आवारातील सभागृहात होणार असून माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडल परिवार संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी अध्यक्षस्थानी असणार आहेत.

Advertisement


उत्तुंग वार्षिक सन्मान प्रदान समारंभात ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांना स्व. विजय वामन गाडगीळ स्मृती उत्तुंग जीवनसाफल्‍य सन्‍मान (रु. पंचाहत्तर हजार), ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचे संस्थापक विद्याधर निमकर यांना उत्तुंग गुणगौरव सन्‍मान (रु. पंचवीस हजार), स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांना उत्तुंग राष्‍ट्रविचार सन्‍मान (रु. पंचवीस हजार) आणि मराठी रंगभूमी तसेच ललित कलांच्या प्रसारासाठी कार्य केलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे या संस्थेला उत्तुंग आदर्श संस्था सन्मान (रु. पंचवीस हजार) देऊन गौरविले जाणार आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि धनादेश असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. स्नेहल दामले सूत्रसंचालन करणार आहेत.


आनंदसोहळ्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मश्री कै. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्ष (दि. १६ मे २०२५) शुभारंभाच्या निमित्ताने माणिक स्वरशताब्दी (२०२५-२०२६) या उपक्रमा अंतर्गत माणिक वर्मा यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ गायिका विदुषी आशा खाडिलकर यांच्या संकल्पनेवर आधारित ‘माणिकस्मृती’ हा विशेष सांगीतिक आदरांजली वाहणारा कार्यक्रम सादर होणार आहे.

युवा गायिका केतकी चैतन्य, वेदश्री खाडिलकर-ओक, सावनी दातार-कुलकर्णी आणि मीनल माटेगावकर या माणिक वर्मा यांच्या निवडक प्रचलित गीतांच्या सादरीकरणाद्वारे सांगीतिक मानवंदना देणार आहेत. अभिजीत जायदे, सारंग भांडवलकर, उदय कुलकर्णी आणि तुषार दीक्षित साथसंगत करणार आहेत. ज्येष्ठ सुसंवादिका मंजिरी धामणकर कार्यक्रमाची गुंफण करणार आहेत.


कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमस्थळी ३० मिनिटे अगोदर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष निमंत्रितांसाठी काही रांगा राखीव असणार आहेत. विशेष सन्मान सोहळा आणि माणिकस्मृती सांगीतिक कार्यक्रमासाठी पुणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular