गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मनिषा निश्चल यांचा पहिल्या वसंत कला गौरव पुरस्काराने सन्मान !!
पूना गेस्ट हाऊस, सी. के. पी. फॅमिली पब्लिक ट्रस्टतर्फे ‘तीन वसंत’ सांगीतिक कार्यक्रम !
पुणे : सांगीतिक क्षेत्रातील तीन प्रतिभावान वसंत यांनी संगीतबद्ध केलेली गीते सादर करणे अवघड असल्याचे सांगून प्रसिद्ध गायिका शैला दातार यांनी ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा’ या शांता शेळके यांनी लिहिलेल्या, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेल्या गीताच्या काही ओळी सादर करून कार्यक्रमात बहार आणली.
: सी. के. पी. फॅमिली पब्लिक ट्रस्ट, पुणे आणि पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित तीन वसंत (पवार, प्रभू, देसाई) या कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या वसंत गौरव प्रदान सोहळ्यात (डावीकडून) किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार, मनिषा निश्चल, शैला दातार, नंदकुमार वढावकर, डॉ. संजयराज गौरीन.
निमित्त होते सी. के. पी. फॅमिली पब्लिक ट्रस्ट, पुणे आणि पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिभावान संगीतकार वसंत प्रभू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘तीन वसंत’ (पवार, प्रभू, देसाई) या सांगीतिक कार्यक्रमाचे! या कार्यक्रमात आघाडीच्या गायिका मनिषा निश्चल यांना दातार यांच्या हस्ते पहिला वसंत कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्या वेळी दातार यांनी रसिकांशी संवाद साधत ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा’ या गीतातील काही ओळी उद्धृत केल्या. पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. वसंत प्रभू यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली असून या निमित्ताने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण सी. के. पी. फॅमिली पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार वढावकर, पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार, डॉ. संजयराज गौरीनंदन, मोहना टिपणीस, सुधीर वैद्य, आपले घरचे विजय पळणीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना मनिषा निश्चल म्हणाल्या, सांगीतिक क्षेत्रात प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची दखल घेतली गेली याचा आनंद आहे. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून गायन-वादन क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांचा आहे.
‘तीन वसंत’ (पवार, प्रभू, देसाई) या सांगीतिक कार्यक्रमाअंतर्गत ‘ए मालिक तेरे बंदे हम’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘नारायण रमा रमणा’, ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘रम्य ही सर्वाहूनी लंका’, ‘आई मला नेसव शालू नवा’, ‘जय गंगे भागिरथी’, ‘लटपट लटपट’ आदी अविट गोडीची लोकप्रिय गीते सादर करण्यात आली.
रुपाली सुळे, अक्षय देशमुख, केतकी देशपांडे, निखिल वैद्य, नील सुळे, अथर्व सुळे, नमिता खारकर, प्राजक्ता पत्की, श्रीकांत कर्णिक यांनी गीते सादर केली. ओंकार दीक्षित यांचे निवेदन होते.
जाहिरात