गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शाश्वती मंडल यांची रंगली प्रभातकालीन स्वरमैफल
शाश्वती मंडल यांचे बहारदार टप्पा गायन !
शाश्वती मंडल यांनी सुमधूर आवाजाने भरले प्रभातकालीन मैफलीत रंग !!
शाश्वती मंडल यांच्या स्वराविष्काराने पुणेकर रसिक मंत्रमुग्ध !
स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत, अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर रागसंगीत मैफलीचे आयोजन
पुणे : अरूण किरणांनी नभात उमटलेली लालिमा, शहराचा मध्यवर्ती भाग असूनही निसर्गरम्य वातावरणात ज्ञानवृक्षाखाली बहुमुखी प्रतिभावान गायिका शाश्वती मंडल यांच्या नादमधूर संगीत मैफलीचा पुणेकर रसिकांनी आज (दि. 28) आनंद घेतला. खुला आवाज, दमदार ताना, बहारदार टप्पा गायन, सुरांचा ठेहराव आणि सुमधूर आवाजाचा लगाव यांच्या संगमाने प्रभातकालीन वातावरण भारावून गेले.
प्रभातस्वर रागसंगीत मैफलीत गायन करताना शाश्वती मंडल. समवेत कौशिक केळकर, स्वाती तिवारी, गार्गी काळे, सुयोग कुंडलकर.
निमित्त होते ते स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर या रागसंगीताच्या नवीन वर्षातील पहिल्या मैफलीचे. गोखले इन्स्टिट्यूटच्या आवारात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली ही मैफल आयोजित करण्यात आली होती.
जन्मशताब्दीवर्षानिमित्त सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांना आदरांजली वाहताना शाश्वती मंडल यांनी मैफलीची सुरुवात पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेल्या ‘सगुण शुभ आज निको भयो’ या अहिर ललित रागातील बंदिशीने केली. द्रुत लयीत ‘जारे जारे जारे कगवा अब ना सतावो’ ही रचना ऐकवून रसिक श्रोत्यांना मोहित केले.
यानंतर शाश्वती यांनी राग जोगियामधील मध्य विलंबित तिलवाडा तीन तालातील ‘एरी मै ना जानू उनके’ या पंडित रातंजनकर बुवा यांनी रचलेल्या बंदिशीचे बहारदार सादरीकरण केले. याला जोडून ‘पार उतारो आज केवटिया’ ही बंदिश आणि ‘दिम दानी दिम’ हा तराणा सादर केला.
मैफलीच्या उतरार्धात शाश्वती यांनी दिग्गज गायक कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना संगीतरूपाने स्वरआदरांजली अर्पण केली. सोहोनी भटियार रागातील कुमारजींची ‘मारुजी भुलो ना म्हारे’ ही बंदिश सादर केली तेव्हा रसिक भावविभोर झाले.
मैफलीची सांगता करताना गुरुंनी विशेष रागातील अनेक टप्पे शिकविले याचा उल्लेख करून शाश्वती यांनी ‘तेजनी जा रे जा गमजावे’ हा टप्पा प्रभावीपणे सादर केला. शाश्वती यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), कौशिक केळकर (तबला), स्वाती तिवारी (तानपुरा आणि सहगायन), गार्गी काळे (तानपुरा) यांनी सुरेल अन् समर्पक साथ केली.
कौशिक केळकर आणि सुयोग कुंडलकर यांनी केलेल्या साथीचे शाश्वती यांनी कौतुक केले.कलाकारांचा सन्मान पंडित सी. आर. व्यास यांचे चिरंजीव शशी व्यास, प्रसिद्ध तबला वादक पंडित रामदास पळसुले, ज्योती व्यास, मकरंद केळकर, स्वप्नगंधा घांगुर्डे यांनी केला.
प्रभातस्वर रागसंगीत मैफल मालिकेअंतर्गत या वर्षात आयोजित करण्यात येणार असलेल्या सांगीतिक मैफली पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांना समर्पित असणार आहेत, असे अपर्णा केळकर यांनी सांगितले. तसेच गुरू पंडित सी. आर. व्यास यांच्या आठवणींना उजाळाही दिला.
रियाजातून दिसतात वेगळ्या वाटासंवादात्मक सत्रात बोलताना शाश्वती मंडल म्हणाल्या, माझ्या घरातच गाणे असल्याने मी वयाच्या कितव्या वर्षी गाणे सुरू केले हे स्मरणातही नाही. बालपण अत्यंत शिस्तीत गेले. आई हीच पहिली गुरू असल्याने सतत संगीताच्या वातावरणातच मी मोठी झाले. पुढे टप्पा गायन शिकताना गुरुंनी वेगळ्या पद्धतीने रियाज करवून घेऊन गायनासाठी गळा तयार करून घेतला.
गायनाचा जेवढा जास्त रियाज कराल तेवढे ते तुमच्यात मुरत जाते व त्यातून वेगळ्या वाटा दिसायला लागतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. संगीत प्रवाही पाहिजे, ते स्थिर नको असे सांगून प्रत्येक गायक आपला आवाज शोधत असतो, दर दहा वर्षांनी गायकाचा आवाज बदलत असतो त्याचा स्वीकार करत गायकाने आपली गायकी बदलावी असे सर्वच गुरूंनी सांगितल्याचा त्यांनी उल्लेख केला. श्रोत्यांच्या बदलत्या रूचीविषयी बोलताना शाश्वती यांनी पुणेकर रसिक आजही बदलले नाहीत असे गौरवोद्गार काढले.
यू-ट्युब गुरू नको
युवा पिढीच्या गायन शिक्षणाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, युवा पिढीचा गळा तयार आहे पण सुरांचा ठेहराव दिसत नाही. गाण्यामागील विचारांचा अभाव जाणवतो. गायन क्षेत्रात प्रत्यक्ष गुरू करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी यू-ट्युब गुरू नकोत हा मोलाचा सल्लाही दिला. गाताना मनाला शांतता हवी असते, त्यामुळे समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नका.
गायनाविषयी आपले विचार, रियाज याकडे लक्ष द्या. तसेच एका गुरूकडे किमान 5 वर्षे तरी शिक्षण घ्या, प्रत्येक वर्षी गुरू बदलू नका असा मोलाचा सल्लाही दिला. शाश्वती यांच्याशी मंजिरी धामणकर यांनी संवाद साधला.
जाहिरात