गोल्डन आय न्यूज नेटवर्क
चव्हाण श्रीराम मंदिरातर्फे आज-उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन !!
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कारसेवकांचा सत्कार, महाआरती
पुणे : अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त श्रीराम अभिमन्यू मंडळ आणि चव्हाण श्रीराम मंदिरातर्फे रविवारी (दि. 21) आणि सोमवारी (दि. 22) कारसेवकांच्या गौरव समारंभासह महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त गणेश चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर, मूळ पुण्यातील गावठाण परिसरातील अतिशय प्राचीन असे 150 ते 200 वर्षांपूर्वीचे श्रीराम मंदिर आहे. पवनीकर कुटुंबियांच्या मालकीची ही खासगी वास्तू 30 वर्षांपूर्वी चव्हाण कुटुंबियांच्या मालकीची झाली. त्यानंतर मंदीराचा चेहरा-मोहरा बदलला.
मूळ मंदिराचा ढाचा कायम ठेवत वास्तूचे स्वरूप बदलण्यात आले. वास्तूच्या खोदकामावेळी आपल्या संस्कृतीच्या वारसा सांगणारी प्राचीन नाणी, भांडी, काही भग्नावेश येथे सापडले. चव्हाण कुटुंबियांने ते पुरातत्व खात्याकडे सुपूर्द केले. चव्हाण कुटुंबियांच्या वतीने गेली 30 वर्षे मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने साजरा केला जात आहे.
दि. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 21 रोजी सायंकाळी 7:30 वाजता ह. भ. प. तेजश्री अरुण वाभुळगांवकर यांचे राष्ट्रनिष्ठा आणि श्रीराम जन्मभूमी विजय कथा या विषयावर कीर्तन होणार आहे. त्यानंतर रात्री 8:30 वाजता कारसेवकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
दि. 22 रोजी सकाळी 11 वाजता सामूहिक रामरक्षा पठण, दुपारी 12:30 वाजता रामनाम जप, पूजा, आरती असे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी 6 वाजता ह. भ. प. रेशीमताई खेडकर आणि सहकाऱ्यांचा भजनसंध्या हा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8:30 वाजता महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
रविवार आणि सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चव्हाण कुटुंबीय आणि श्री राम-अभिमन्यू सार्वजनिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
जाहिरात