गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पाऊल भजनातून पुणेकरांनी अनुभवली ‘दिंडी’ !!
दादा सबनीस जन्मशताब्दी वर्ष अन् श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कार्यक्रम !!
पुणे : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीची ओळख म्हणजे दिंडी. दिंडी म्हणजेच भक्तांनी एकत्र येऊन विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरपर्यंत केलेला प्रवास. पाऊल भजनांच्या माध्यातून ही अनोखी दिंडी पुणेकरांना अनुभवायला मिळाली ती भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांची जन्मशताब्दी आणि अयोध्येतील मर्यादापुरुषोत्तम श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त.
भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांची जन्मशताब्दी आणि अयोध्येतील मर्यादापुरुषोत्तम श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘दिंडी’ सादर करताना चिन्मय मिशनचे कलावंत.
भजने, भारूड, गवळण यांचा समावेश असलेला हा दिंडी सोहळा घोले रोडवरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची मूळ संहिता व संगीत वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांचे असून कार्यक्रमाची निर्मिती चिन्मय मिशन, पुणे यांची होती. तीन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिन्मय मिशनच्या 35 कलाकारांनी पारंपरिक वेशभूषेत हा कार्यक्रम सादर केला.
ज्ञानेश्वरबुवा कपलानी, नंदूकाका पाटणकर, मिलिंद टिळक, डॉ. मंजिरी गोखले, कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘वारी’ या आपल्या सांस्कृतिक लेण्यातील पारंपरिक संगीताचे दर्शन भजनाचार्य मनोहरपंत सबनीस यांनी पहिल्यांदा 1968 मध्ये ‘माझे माहेर पंढरी’ या कार्यक्रमातून घडविले होते.
मूळ संहितेत कुठलाही बदल न करता ‘दिंडी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गणेश वंदना आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’ या नाम गजराने ‘दिंडी’ची सुरुवात झाली.
‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’, ‘विठोबा रखुमाई’, ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’, ‘पांडुरंगी मन रंगले’, ‘आवा चालली पंढरपूरा वेशी पासून आली घरा’, ‘दार उघड बया दार’ या रचनांबरोबरच देवीचा गोंधळ, रुपकात्मक भारूड, काल्याचे कीर्तन सादर करीत कलाकारांनी पंढरपूर वारीचे समग्र दर्शन घडविले.
नंदूकाका पाटणकर (संवादिनी), मिलिंद सबनीस (ऑर्गन), मिलिंद पाटणकर (तबला), अविनाश तिकोनकर, विनित तिकोनकर (पखवाज) यांनी साथसंगत केली.
मिलिंद सबनीस यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
जाहिरात