गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताकडे जागतिक नेतृत्वाची क्षमता
एआय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. अमेय पांगारकर यांचा विश्वास !
पुणे : ‘आपली इच्छा असो किंवा नसो, आपण स्मार्ट युगाचे घटक आहोत, यापुढेही राहणार आहोत. त्यातही भावी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात (एआय) जागतिक नेतृत्वाची क्षमता भारताकडे आहे’, असा विश्वास एआय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ तसेच डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षक व सल्लागार डॉ. अमेय पांगारकर यांनी येथे व्यक्त केला.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ‘अंडरस्टँडिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंॅड मीडिया’ या शीर्षकांतर्गत डॉ. अमेय यांनी सविस्तर मांडणी केली. ‘एआय हे क्षेत्र वेगाने विकसित होत असले, तरी अशा प्रकारच्या आभासी विश्वाचे उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांत दिसतात, असे सांगताना डॉ. पांगारकर यांनी ‘समरांगणसूत्रधार’ या ग्रंथाचा उल्लेख केला.
‘आधुनिक युगात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैन्याच्या हालचाली समजण्यासाठी ब्रिटिश संशोधकांनी वापरलेल्या डिकोडिंग सिस्टीममधून एआय हे क्षेत्र विस्तारले’, असेही ते म्हणाले.
डॉ. अमेय पांगारकर
आपण सर्वजण स्मार्ट मोबाईल्स वापरतो. डिजिटल युगाचा आपण अंगिकार केल्याचे ते चिन्ह आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेशाची ती पहिली पायरी आहे. असंख्य प्रकारचा डेटा ही त्याचा आधारस्तंभ आहे, असे सांगून डॉ. पांगारकर म्हणाले, ‘असंख्य प्रकारची एआय टूल्स आपण कळत नकळत रोज वापरतो. एक प्रकारचा डिजिटल उद्रेक आपण अनुभवत आहोत. आपले निर्णय आपल्या वतीने ही यंत्रणा घेत आहे.
यापुढेही अधिकाधिक स्मार्ट डिव्हाईस आपण वापरणार आहोत. आपली गती वाढणार आहे. विविध प्रकारचा डेटा वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र विस्तारत जाणार आहे. अर्थात या नव्या तांत्रिक आणि आभासी युगातही मानवी बुद्धिमत्तेचे महत्त्व अबाधित राहील, फक्त त्यांचा विनियोग बदलेल.
नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील. भावी काळ एआयच्या साह्याने काम करणाऱ्यांचे असेल, त्यामुळे वेळीच गती वाढवणे, बदल स्वीकारणे, स्वतःला सतत अपडेट राखणे आणि बदलातील वारंवारिता आत्मसात करणे आवश्यक ठरणार आहे’.
‘माध्यमे आणि मनोरंजनाच्या विश्वातही एआय़मुळे कल्पनातीत परिवर्तन घडत आहे. ही प्रक्रिया सुरूच राहील. संज्ञापन, आशयनिर्मिती, दृकश्राव्य निर्मिती, गेमिंगचे विश्व अशा प्रत्येक ठिकाणी एआयमुळे बदल घडत आहेत.
जगात सर्वाधिक युवकांची संख्या भारतात असल्याने एआयचे क्षेत्र भारतीय बुद्धिमान युवकांसाठी विविध संधी घेऊन येईल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता असलेला देश म्हणून पुढे येईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशनला क्युबिक्स टेक कंपनीचे अध्यक्ष नितीन नाईक यांनी भेट दिलेल्या डिजिटल इंटेलिजन्ट बोर्डचे उद्घाटन अमेय पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यांनी स्वागत केले. प्रसाद मिरासदार यांनी मनोगत मांडले. विदुला टोकेकर यांनी परिचय करून दिला.
जाहिरात