गोल्डन आय न्यूज नेटवर्क
परदेशी विद्यार्थ्यांना घडले महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचे दर्शन !
आयसीसीआरअंतर्गत शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या 20 देशातील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा !!
पुणे : परदेशातून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सामाजिक, कला तसेच खाद्य संस्कृतीचे दर्शन घडले.
निमित्त होते ते केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालयाअंतर्गत बांगलादेश, नेपाळ, मोझँबिक, पोलंड, श्रीलंका, थायलंड, तुर्कमेनिस्तान, उझबेकीस्तान, व्हिएतनाम, कंबोडिया, गांबिया, इंडोनेशिया, जपान, केनिया, मॉरिशस आदी 20 देशातून आलेल्या 80 विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम झाला. आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार, कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी, आयसीसीआरच्या सल्लागार कल्याणी सालेकर, लीना आढाव, विश्वनाथ कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित डॉ. सुप्रिया शेलार, डॉ. योगेश्वर भट, विश्वनाथ कल्याणकर, लीना आढाव आणि राज कुमार.
राज कुमार विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, शिक्षणासाठी आलेल्या तुम्हा विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्याची ओळख व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरुवातीस विद्यार्थ्यांचे स्वागत महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून करण्यात आले.
आयटीडीसीच्या अधिकारी डॉ. सुप्रिया शेलार यांनी माहितीपटाद्वारे पुणे शहर व जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, शैक्षणिक संस्था तसेच खाद्य संस्कृतीची विद्यार्थ्यांना माहिती दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, जग्तगुरू संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याची माहिती सांगण्यात आली.प्रा. डॉ. योगेश्वरी भट यांनी देशाची सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा या विषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा जीवनपट उलगडून सांगितला.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचे दर्शन व्हावे या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणी सालेकर आणि त्यांच्या शिष्या तसेच सुवर्णा बाघ यांच्या शिष्यांनी गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्या नंतर कोळीनृत्य, पंढरपूरच्या वारीचे दर्शन त्याच प्रमाणे मंगळागौरीचे खेळ, गवळण, लावणी तसेच देवीचा गोंधळ आणि गौरव महाराष्ट्राचा असे कार्यक्रम सादर केले. त्याला परदेशी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मान्यवरांचा सत्कार राज कुमार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले तर आभार संजीवनी स्वामी यांनी मानले.
जाहिरात