गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बालकलाकारांचा घुमला ‘आव्वाज कुणाचा..’
महाराष्ट्रीय कलोपासक, नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण !!
पुणे : आत्मविश्वासाने केलेले सादरीकरण, प्रमुख पाहुण्यांकडून झालेले कौतुक, पालकांचा पाठींबा अन् बालकलाकारांनी ‘आव्वाज कुणाचा..’ म्हणत दणाणून सोडलेले नाट्यगृह अशा भारावलेल्या वातावरणात आज (दि. 18) महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर आंतरशालेय नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रंगला.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर आंतरशालेय नाटिका स्पर्धेत भालबा केळकर करंडक पटकाविणारा मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाचा संघ. समवेत डॉ. संगीता बर्वे, प्रकाश पारखी, अनंत निघोजकर, गणेश जाधव, राजा राणा, संगीता कुलकर्णी.
भरत नाट्य मंदिर येथे पारितोषिक वितरण सभारंभ आयोजित करण्यात आला होता. दि. 11 ते 14 जानेवारी या कालावधीत भरत नाट्य मंदिरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत 29 शाळांचा सहभाग होता. पारितोषिक वितरण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री डॉ. संगीता बर्वे, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, उद्योजक गणेश जाधव, महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. राजा राणा, संजय पेंडसे, संगीता कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. सुरुवातीस स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या चार नाटिकांचे सादरीकरण झाले.
अध्यक्षीय पदावरून बोलताना डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, मुलांचे सादरीकरण बघून खरोखरच ‘लहानपण देगा देवा’ असे म्हणावेसे वाटते. मुलांनी आत्मविश्वासाने केलेले सादरीकरण खरोखर कौतुकास्पद आहे. नाटिकेतील, स्पर्धेत सहभागामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नक्कीच हातभार लागणार आहे.
स्पर्धेत सहभागी झालेली काही मुले इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकत असतीलही; पण त्यांच्या जीभेवर स्पर्धेच्या निमित्ताने मराठी भाषा रुळते आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
मुलांना भावणारे विषय निवडून त्यावर नाटिका सादर करताना मुलांना झालेला आनंद म्हणजे या स्पर्धेचे यश आहे, असे मत गणेश जाधव यांनी व्यक्त केले.
प्रकाश पारखी म्हणाले, भालबा केळकर नाटिका स्पर्धा 25 वर्षे घेतली. नाट्यसंस्कारच्या माध्यमातून तयार झालेले आपलेच विद्यार्थी महाराष्ट्रीय कलोपासकच्या माध्यमातून ही स्पर्धा पुढे चालवित आहेत याचा खरोखरीच आनंद आहे. पालकांच्या वतीने वलय मुळगुंद यांनी मनोगत व्यक्त केले.
परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना संगीता कुलकर्णी म्हणाल्या, मुलांच्या भावविश्वाला जवळ जाणारे आणि बाल कलाकारांनी समजून उमजून केलेले सादरीकरण हे निकालाचे निकष होते.
मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर यांनी केला. निकाल वाचन संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंती लोहकरे यांनी तर आभार अभिजित देशपांडे यांनी मानले.
—
स्पर्धेचा सविस्तर निकाल
सांघिक प्रथम – भालबा केळकर करंडक : लहानपण देगा देवा (मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय)
नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरण – तळ्याच्या काठावर (सिटी प्राईड स्कूल, निगडी)
सांघिक द्वितीय – चला करूया श्रीगणेशा (एस. पी. एम. इंग्लिश स्कूल)
सांघिक तृतीय – झिपरी (आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे)
सर्वोत्तम लेखन : संध्या कुलकणी, अमृता जोगदेव (ढंगांचे पांघरूण, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी)
उत्तेजनार्थ : दिप्ती अडवडेकर (इटकुलं बिटकुलं, स्वरसाधना पुणे)
सर्वोकृष्ट दिग्दर्शक : दिपाली देशपांडे, मधुरा प्रधान (अ ग ग ग ग कोप जाहला, भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या मंदिर कोथरूड)
दिग्दर्शन उत्तेजनार्थ : राधिका थत्ते (नैवेद्य, श्रीनिवास सिरीन काऊंटी, सिंहगड रोड)
सर्वोकृष्ट वैयक्तिक अभिनय : मिहिका जोशी (मधुरा, चला करुया श्रीगणेशा, एस. पी. एम. इंग्लिश स्कूल)
अभिनय नैपुण्य : अभिनेता : रियान लोहोकरे (राजू, भागा भूत, आकांशा, बाल रंगभूमी)
अभिनय नैपुण्य : अभिनेत्री : प्राजना तिवारी (झिपरी चेटकीण, झिपरी, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे)
वाचिक अभिनय नैपुण्य : अनिष जुवेकर (किरण, नैवेद्य, श्री निवास सिरिन काऊंटी, सिंहगड रोड)
अभिनय प्रमाणपत्र : अमोघ कुलकर्णी (गव्हाचा दाणा, न बलनेली चांदणी, नवीन मराठी शाळा)
रूत्वी करडे (रेबनो मासा, एका रेनबोची गोष्ट, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, मानाजीनगर)
इशान बुधकर (तेजन, स्व-अध्याय, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल, सिंहगड रोड)
शिवण्या शिंदे (धुन छुन, ढगांचे पांघरूण, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी)
देवश्री पोळ (मिनू, जादूचा डबा, शिशु विहार प्राथमिक शाळा, एरंडवणे)
राजेश्वरी शेंडकर (धूली, धूली, म. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे व्हिजन इंग्लिश मिडिअम स्कूल)
खुशी शेटे (बहिण, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जॉयस इंग्लिश मिडिअम स्कूल, चाकण)
कार्तिक काळे (टोमॅटो, ला-टोमाटिना, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल, सिंडगड रोड)
अन्वेषा देशकर (सखुबाई, अ ग ग ग ग कोप जाहला, भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या मंदिर, कोथरूड)
मीरा अडकर (कोमल, नैवेद्य, श्रीनिवास सिरिन काऊंटी, फेज 2, सिंहगड रोड)
जाहिरात