गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पर्यावरणाचा सन्मान करा; पर्यावरणाला आपलेसे करा : डॉ. राजेंद्रसिंह !
आपले मूळ, जन्मदात्री आणि नदीविषयी आस्था बाळगा तरच पर्यावरण टिकेल : डॉ. राजेंद्रसिंह !!
तेर पॉलिसी सेंटर आणि टाटा मोटर्स आयोजित पर्यावरणविषयक तेर ऑलिंम्पियाड स्पर्धेचे पारितोषिक वितरण
पुणे : पाण्याविना जगातील काही देशांवर लाचार होण्याची वेळ आली आहे; त्या देशातील बेकारी वाढली आहे. आपल्या देशात जमिनीखालील 62 टक्के पाण्याचा उपसा झालेला आहे. अशा परस्थितीत आपल्या देशाचे भविष्य काय असेल याचा विचार करण्याची आज गरज आहे. पर्यावरणाला आपलेसे करा, त्याचा सन्मान करा आणि पर्यावरणाविषयी प्रेम व्यक्त करा असा कळकळीचा सल्ला राजस्थानमध्ये जलक्रांती घडवून आणणारे तसेच जलपुरुष अशी ओळख असलेले डॉ. राजेंद्रसिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपले मूळ, जन्मदात्री आणि नदी यांच्याविषयी आस्था बाळगली तरच पर्यावरण टिकून राहिल, असेही त्यांनी सूचित केले.
वैश्विक पातळीवर पर्यावरणविषयक कार्य करणाऱ्या तेर (टेक्नॉलॉजी, रिसर्च, रिहॅबिलिटेशन फॉर द एनव्हॉयर्नमेंट) पॉलिसी सेंटरने टाटा मोटर्सच्या सहकार्याने देश पातळीवर पर्यावरणविषयक तेर ऑलिंम्पियाड स्पर्धेचे आयोजन केले होते. या तेर ऑलिंम्पियाड स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ आज (दि. 10) डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेर पॉलिसी सेंटरच्या निर्देशक डॉ. विनिता आपटे, टाटा मोटर्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर (सीएसआर) रोहित सरोज, तेर पॉलिसी सेंटरचे विश्वस्त अजय फाटक, क्रिएटिव्ह डायरेक्टर विक्रांत अरगडे मंचावर होते. पाचवी ते नववी (सॅपलिंग), दहावी ते बारावी (प्लांट) आणि महाविद्यालयीन (ट्री) अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. राजेंद्रसिंह. समवेत रोहित सरोज, डॉ. विनिता आपटे, अजय फाटक, विक्रांत अरगडे.
डॉ. राजेंद्रसिंह पुढे म्हणाले, सर्व भाषांमध्ये देवाला ‘भगवान’ हा एक समान शब्द आहे. या देवाला आपण प्रार्थनास्थळांमध्ये शोधतो पण देव आपल्यातच आहे हे विसरतो. आपले मूळ, जन्मदात्री म्हणजे स्त्री, निसर्ग आणि नदी याचा सन्मान केला तर तुम्हाला निसर्गाच्या माध्यमातून तुमचा देव आणि यश प्राप्त होईल.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करणारे प्रा. अनंत कुलकर्णी आणि प्रा. शरद सोनवणे यांचा विशेष सन्मान या वेळी करण्यात आला.
तेर ऑलिंम्पियाडमध्ये दरवर्षी देशभरातून तीन लाख विद्यार्थी सहभागी होतात, अशी माहिती डॉ. विनिता आपटे यांनी प्रास्ताविकात सांगितली.
तेर पोलिसी सेंटर महिला व युवक यांच्यासाठी सातत्याने कार्य करीत असून देशभरात मुलांच्या माध्यमातून पर्यावरण चळवळ सुरू करणारी संस्था आहे, असेही डॉ. आपटे म्हणाल्या. रोहित सरोज यांनी स्पर्धा आयोजनामागील भूमिका विशद केली.
तेर ऑलिंम्पियाड स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. राजेंद्रसिंह, रोहित सरोज, डॉ. विनिता आपटे, अजय फाटक, विक्रांत अरगडे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता धोकटे यांनी केले तर आभार अजय फाटक यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत डॉ. विनिता आपटे यांनी केले.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी (पाचवी ते नववी) : अभिनव राज (डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय, दिल्ली), नशित अकमल (माऊंट लिटेरा झी स्कूल, जमशेदपूर, झारखंड), आयुष्मान परिदा (ओडिसा आदर्श विद्यालय, पुरी), नेहा कुमारी, तेजस्वी सिंग, तुषार कुमार (माऊंट लिटेरा झी स्कूल, जमशेदपूर, झारखंड), नलिन अग्रवाल (अपिजय स्कूल, खारघर, मुंबई), सवेता सवेता (एपीएस, पुणे), हृदश्री क्रिष्णन (ख्रिस्त नगर, कावदिअर, केरळ), आकृती बेहुराय (न्यू एरा सिनिअर सेकंडरी स्कूल, गुजराथ).
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी (दहावी ते बारावी) : अर्जुन जोंधळे (पद्मश्री विखे पाटील ज्युनिअर कॉलेज, लोणी), तनय अगरवाल (सेंट मेरिज स्कूल, गुजराथ), संग्राम वाघमारे (जवाहर नवोदय विद्यालय, पुणे), श्रद्धा वाघ (न्यू इंग्लिश स्कूल, चंचाली), अमितेश कृष्णा (जिंदाल स्कूल बारबिल, ओरिसा), मुक्ता सप्रे (बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे), संजय राठोड (व्ही. एस. सातव हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, वाघोली, पुणे), दर्शिल जेठ (सेंट मेरिज स्कूल, गुजराथ), वैष्णवी जेधे (जवाहर नवोदय विद्यालय, पुणे), इशान चेडे (राष्ट्रीय हायस्कूल, अमरावती, महाराष्ट्र).
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी (महाविद्यालयीन गट) : रितम हलदर (भास्कराचार्य कॉलेज ऑफ ॲप्लाईड सायन्सेस, दिल्ली), हृदयेश कृष्णन (श्री मुथ्थुकुमारन् मेडिकल कॉलेज, केरळ), प्रथमेश शित्रे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अगरताला).
जाहिरात