गोल्डन आय न्यूज नेटवर्क
महिलांसाठी श्यामल करंडक एकपात्री स्पर्धेचे आयोजन !!
पुणे : एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने केवळ महिलांसाठी ज्येष्ठ एकपात्री कलाकार सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ श्यामल करंडक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एकपात्री कलाकार परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री देशपांडे, श्यामल कुलकर्णी यांच्या कन्या अनुजा कोल्हटकर यांनी आज (दि. 8) पत्रकार परिषदेत दिली.
स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 17 व 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणार असून अंतिम फेरी दि. 19 फेब्रुवारी रोजी भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. त्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. प्राथमिक फेरी निळू फुले कला अकादमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, काका हलवाई शेजारी, शास्त्री रोड, सदाशिव पेठ येथे होणार आहे.
स्पर्धेतील अंतिम विजेत्या महिलेस पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व श्यामल करंडक देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकास तीन हजार रुपये व स्मृतीचिन्ह, तृतीय क्रमांकास दोन हजार रुपये व स्मृतिचिन्ह तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेची प्रवेश फी 350/- रुपये आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2024 असून, स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी अनघा गुपचूप (9890130221) किंवा प्रिती विप्रदास (9890942240) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेश फी भरण्यासाठी क्रमांक 9011343513.
असे आहेत स्पर्धेचे नियम : स्पर्धा मराठी भाषेत होणार असून 18 वर्षांवरील स्पर्धकास सहभागी होता येणार आहे. एकपात्री सादरीकरण म्हणजे नाटकातले स्वगत अथवा नाट्यछटा नव्हे. सादरीकरणासाठी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.
तसेच स्पर्धकाने किमान दोन अथवा दोन पेक्षा जास्त पात्रांच्या भूमिका सादर करणे अपेक्षित आहे. प्रत्येक स्पर्धकाला किमान 5 व जास्तीत जास्त 8 मिनिटे सादरीकरण करायचे असून अंतिम फेरीत दाखल होणाऱ्या स्पर्धकाला प्राथमिक फेरीतील सादरीकरणच करायचे आहे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सादरीकरणात कोणत्याही जातीचा, धर्माचा, राजकीय व्यक्तींचा उल्लेख नको, समाजात तेढ निर्माण होईल असे सादरीकरण नको. स्पर्धकांनी जाण्या-येण्याचा खर्च स्वत: करायचा आहे.
सौ. श्यामल कुलकर्णी यांचे देश-विदेशात एकपात्री कार्यक्रम…
सौ. श्यामल कुलकर्णी यांनी प्रथम 1975 मध्ये स्वानुभवावर आधारित, स्वलिखित ‘असे संसार संसार’ हा विनोदी एकपात्री कार्यक्रम सादर केला. तो रसिकांनी आणि मान्यवरांना अतिशय भावला. त्यावेळी बोटावर मोजण्या एवढे एकपात्री कलाकार या क्षेत्रात कार्यरत होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच बिलासपूर, रायपूर, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर, हुबळी आणि परदेशात लंडन, अमेरिका, सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळात असे 1000च्यावर त्यांचे एकपात्री कार्यक्रम झालेले आहेत.
एकपात्री हा कलाप्रकार सर्वदूर पसरावा असा त्यांचा प्रयत्न होता. एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्रच्या स्थापनेपासून त्यांचा त्यात सहभाग होता. त्या एक वर्ष परिषदेच्या अध्यक्षही होत्या. आपण कोणत्या परिस्थितीतून आलो, मिळालेल्या संधी आणि स्त्री कलाकार म्हणून कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याचा त्यांनी कधी विसर पडू दिला नाही.
गेल्या दोन दशकात कलाक्षेत्रात मुली-महिलांना पुढे आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. सौ. श्यामल कुलकर्णी यांची या कलाप्रकाराबद्दलची आस्था लक्षात घेऊन त्यांचे कार्य तसेच पुढे चालू ठेवून त्यांच्या स्मृती जतन व्हाव्यात यासाठी स्त्री कलाकारांना पारितोषके देण्याचा मानस कुलकर्णी कुटुंबीयांनी व्यक्त केला.
एकपात्री कलाकार परिषदेच्या सहकार्याने या स्पर्धा आयोजित करत या कलाप्रकाराला मूर्त स्वरूप दिले जात असल्याचे उपाध्यक्षा अनुपमा कुलकर्णी व सचिव पल्लवी परब भालेकर यांनी सांगितले.
जाहिरात