गोल्डन आय न्यूज नेटवर्क
माँसाहेब, शिवराय आणि शंभूराजांच्या जयघोषात बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
पुणे : ‘जय जिजाऊ’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत आणि रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून बालकुमार चित्रपट महोत्सवाचा आज (दि.24) शुभारंभ झाला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाद्वारे मुलांनी वीरश्रीची अनुभूती घेतली.
संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 24 ते बुधवार, दि. 30 एप्रिल 2025 या कालावधीत कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट गृहात बालकुमार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी प्रतिथयश युवा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर, प्रकाश चाफळकर, कावरे आईस्क्रीमचे राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर, प्रसाद मिरासदार यांची उपस्थिती होती. या महोत्सवात लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेले पाच चित्रपट दाखविण्यात येत असल्याने त्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. महोत्सवाचे यंदाचे 27वे वर्ष आहे.
भविष्यात नवीन दिग्पाल दिसेल..
उद्घाटनप्रसंगी चित्रपट महोत्सवाच्या आठवणी सांगताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, लहानपणापासून मी हा बालचित्रपट महोत्सव अनुभवला आहे.
बालकुमार चित्रपट महोत्सवाचे फुगे सोडून उद्घाटन करताना दिग्पाल लांजेकर, प्रसाद मिरासदार, सुनील महाजन, राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर.
सातत्याने या महोत्सवाचे आयोजन करणे कठीण आहे. परंतु आम्हा बालगोपाळांना या चित्रपट महोत्सवातून उत्तमोत्तम चित्रपट दरवर्षी पहायला मिळत गेले आणि त्यातूचन माझ्यातील कलावंत-दिग्दर्शक घडला. हा महोत्सव वर्षांनुवर्षे अखंडितपणे बालकुमारांना आनंद देईल आणि यातूनच नवीन दिग्पाल उदयास आलेला दिसेल.
प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, बालगोपाळांसाठी त्यांच्या वयाला रुचतील असे चित्रपट दर्शविण्याचे काम कावरे आईस्क्रीम आणि कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने करण्यात येत आहे.
या वर्षी चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच एकाच दिग्दर्शकाचे पाच चित्रपट दाखविण्यात येत आहे याचा आनंद आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा आणि वैभवशाली इतिहास मुलांना कळावा या हेतूने ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात येत आहेत.
सुरुवातीस विद्या भोपे हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती विशद केली. मान्यवरांचे स्वागत राजूशेठ कावरे आणि सुनील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
समारोपाला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातील कलावंतांची उपस्थिती..
शुक्रवार, दि. 25 रोजी ‘पावनखिंड’, शनिवार, दि. 26 रोजी ‘फर्जंद’, रविवार, दि. 27 रोजी ‘फत्तेशिकस्त’, सोमवार, दि. 28 रोजी ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’, मंगळवार, दि. 29 रोजी ‘तेंडल्या’, बुधवार, दि. 30 रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हे चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत.
समारोप समारंभास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक प्रवीण बढेकर, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर तसेच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातील कलावंतांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.