गोल्डन आय न्यूज नेटवर्क
जागतिक ग्रंथ दिनानिमित्त ग्रंथ भेट
बाल साहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षाचा उपक्रम
‘जागतिक ग्रंथ दिना’चे औचित्याने सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या ‘बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षा’त अनोखा ‘अक्षर साहित्य भेट’ उपक्रम संपन्न झाला.
जागतिक ग्रंथदिनानिमित्ताने ‘बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षा’त संपन्न झालेल्या ग्रंथ भेट उपक्रमात सहभागी आबासाहेब अत्रे प्रशालेतील शिक्षक वर्ग.
माणसाच्या घडणीत असलेले पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन संदर्भ ग्रंथपाल व माहितीतज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांनी आबासाहेब अत्रे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील शिक्षकांना वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा या उद्देशाने नवी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांना ‘ग्रंथ भेट’ देत जागतिक ग्रंथ दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.
या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना भडसावळे म्हणाले, ‘नवी पिढी घडवायची तर वाचनाला पर्याय नाही.
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले तर ग्रंथ दिन हा केवळ एका दिवसापुरता न राहता तसेच ‘वाचन’ हा विशिष्ट वयोमर्यादेतच करण्याचा उपचार न राहता तो जगण्याचा अविभाज्य भाग बनेल.’ या भडसावळे यांच्या विचारांना उपस्थित सर्वांनी सहमती दर्शवत ‘घरोघरी असावी ग्रंथसंपदा’ उपक्रमात सर्व शिक्षकांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
उपक्रमात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, प्राजक्ता जोशी, प्रकाश आठवले, प्रसाद भडसावळे यांनी भेट दिलेली २५ हजार रुपयांची शंभर पुस्तके वितरित करण्यात आली.
याप्रसंगी मराठी माध्यमाचे प्राचार्य श्री प्रवीण सुपे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका चंचला ललवाणी तसेच दोन्ही विभागातील शिक्षक उपस्थित होते.