गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सतारीचे झंकार आणि सहगायनाने भरले रंग !!
पुणे : स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या उत्तरार्धात इटावा घराण्याचा वारसा पुढे नेणारे युवा पिढीतील लोकप्रिय सतारवादक शाकीर खान यांनी राग जोग मध्ये आलाप, जोड, झाला या पारंपरिक क्रमाने वादन करत द्रुत लयीत बहारदार सादरीकरण केले. त्यांच्या सतारीच्या झंकारांनी स्वरमंडप भरून गेला. त्यांना यशवंत वैष्णव यांनी तबल्यावर अप्रतिम साथ केली.
पं. शौनक अभिषेकी यांनी अडाणा रागातील रूपक तालातील पं. रामाश्रय झा यांची रचना प्रारंभी सादर केली. त्याला जोडून एकतालातील पारंपरिक बंदिश तसेच सुहा कानडा रागातील तराणा पेश केला. तसेच पं. राजाश्रय झा यांनी बांधलेली वैशिष्ट्यपूर्ण रागमालिका त्यांनी सादर केली.
त्यामध्ये यमन कल्याण, सरस्वती, सिंदुरा, दरबारी, जयजयवंती, छायानट, हमीर, वसंत, भटियार, ललत, देस, तिलककामोद, दुर्गा, शंकरा या रागांची झलक होती. भरत कामत (तबला), आदित्य ओक (हार्मोनियम) यांनी तसेच अभेद अभिषेकी यांनी स्वर व तानपुरा साथ केली.
एकत्रित सादरीकरणात प्रसाद जोशी (पखवाज) आणि उद्धव कुंभार (तालवाद्य) यांचा सहभाग होता.
अखेरीस मंजुषा पाटील, आनंद भाटे आणि शौनक अभिषेकी यांनी एकत्रितपणे भक्तिरचनांची मेडली सादर केली. आनंद भाटे यांनी ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’ , मंजुषा पाटील यांनी ‘श्रीरंगा कमलाकांता हरी पदराते सोड रे’, तर शौनक अभिषेकी यांनी ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हे अभंग सादर केले.
‘अगा वैकुंठीच्या राया’ ही भक्तिरचना सादर करत या कलाकारांनी स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता केली.
—————————————————————
जाहिरात