गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मुलतानी आणि दुर्गा रागांचे अनोखे दर्शन
स्वरझंकार संगीत महोत्सवास रसिकांच्या उदंड प्रतिसाद सुरुवात !
पुणे : प्रसिद्ध गायिका मंजुषा पाटील यांनी रंगवलेला सायंकालीन राग मुलतानी आणि प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या स्वरांतून साकारलेला राग दुर्गा, ही स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरेल वैशिष्ट्ये ठरली. युवा पिढीच्या या दोन्ही कलावंतांनी आपल्या स्वराविष्काराने रसिकांची भरभरून दाद मिळवली.
एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी व व्हायोलिन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वरझंकार संगीत महोत्सवाची गुरुवारी (दि. 4) दिमाखात सुरुवात झाली. कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पिस युनिर्व्हसिटीच्या प्रांगणात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे 15 वे वर्ष आहे. महोत्सव दि. 4 ते दि. 7 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी प्रारंभी कै. काणे बुवा व पंडित उल्हास कशाळकर यांच्या शिष्या विदुषी मंजुषा कुलकर्णी पाटील यांनी राग मुलतानी मधील बंदिशीचे बहारदार सादरीकरण केले. ‘गोकुल गाव का छोरा’, ही पारंपरिक रचना सादर करून त्यांनी रागाची वैशिष्ट्ये स्वरांतून साकारली. त्यांना रोहित मुजुमदार (तबला) आणि आदित्य ओक (हार्मोनियम) यांनी पूरक साथसंगत केली. आर्या देव, देवश्री दंडवते आणि तनिष्क अरोरा यांनी तानपुऱ्यावर होते.
स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांनी राग दुर्गामध्ये ‘तू रस कान्ह रे’ ही रचना विलंबित एकतालात सादर केली. ‘चतर सुघर’ ही द्रुत त्रितालातील बंदिश रसिकांची विशेष दाद घेणारी ठरली. स्वरझंकार महोत्सवाच्या उत्तरार्धात इटावा घराण्याचे उस्ताद शाहिद परवेझ यांचे शिष्य व सुपुत्र शाकीर खान यांचे सतार वादन तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध गायक पंडित शौनक अभिषेकी यांचे गायन झाले.
मंजुषा कुलकर्णी पाटील, आनंद भाटे व शौनक अभिषेकी या तीनही कलाकारांच्या सहगायनाने पहिल्या दिवसाचा समारोप झाला.
–
कलाकारांचे कुटुंब
देशात एकूण 40 ठिकाणी स्वरझंकार संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. परदेशातही हा महोत्सव रंगतो. साऱ्या कलाकारांचे मिळून आता एक कुटुंब तयार झाले आहे, असे उद्गार महोत्सवाचे आयोजक पं. अतुलकुमार उपाध्ये यांनी दीपप्रज्वलन प्रसंगी काढले. एम आय टीचे कुलगुरू डॉ. चिटणीस यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.
आज महोत्सवात (दि. 5 जानेवारी)
पंडित संजीव अभ्यंकर यांचे गायन
पंडित पूर्बायन चॅटर्जी यांचे सतारवादन
जगप्रसिद्ध सुफी गायक मामे खान यांचे गायन
समारोप : मामे खान व पूर्बायन चॅटर्जी यांच्या गायन-वादनाची जुगलबंदी
जाहिरात