गोल्डन आय न्यूज नेटवर्क
24व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे धायरीत आयोजन !!
दि. 19 व दि. 20 रोजी ज्येष्ठ, युवा कलाकारांना ऐकण्याची पर्वणी!!
प्रसिद्ध शहनाईवादक डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांना ब्रह्मनाद पुरस्कार
पुणे : ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 24व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे शनिवार, दि. 19 आणि रविवार, दि. 20 एप्रिल 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कलाकारांसह युवा कलाकारांचा सहभाग हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.
एकेकाळी ‘सोन्याची पायरी’ म्हणून ओळख असलेल्या धायरी या पुण्यातील उपनगरात किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित श्रीकांत देशपांडे यांच्या ईच्छेनुसार डॉ. पंडित संजय गरुड शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करत आहेत. गेल्या 24 वर्षांपासून शास्त्रीय संगीताची बीजे रुजविण्याबरोबरच ब्रह्मनाद कला मंडळातर्फे संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात अनेक ज्येष्ठ व नामवंत कलाकारांनी सादरीकरण केले आहे.
यंदाचा महोत्सव सायंकाळी 5:30 ते 10 या वेळात कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयातील राजमाता जिजाऊ माँसाहेब बहुउद्देशिय सभागृहात होणार आहे.
संगीत महोत्सवानिमित्त दिल्या जाणाऱ्या ह. भ. प. मारुतीराव गरुड स्मृती ब्रह्मनाद पुरस्काराने प्रसिद्ध शहनाईवादक डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक डॉ. पंडित संजय गरुड आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे संचालक अनिकेत चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ब्रह्मनाद कला मंडळाच्या संचालिका रागिणी गरुड, सुभाष चाफळकर, मिलिंद जोशी या वेळी उपस्थित होते. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. 19) सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित डॉ. राम देशपांडे यांचे सुपुत्र आणि शिष्य गंधार देशपांडे यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य प्रसिद्ध संवादिनी वादक पंडित सुधीर नायक यांचे एकल संवादिनी वादन होणार असून पहिल्या दिवसाच्या महोत्सवाची सांगता प्रसिद्ध गायिका विदुषी पद्मा देशपांडे यांच्या गायनाने होणार आहे. विदुषी हिराबाई बडोदेकर आणि विदुषी सरस्वतीबाई राणे यांच्याकडून देशपांडे यांनी किराणा घराण्याच्या गायकीचे प्रशिक्षण घेतले आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 20) सुप्रसिद्ध शहनाईवादक डॉ. पंडित प्रमोद गायकवाड यांचा 24वा ब्रह्मनाद पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. पंडित गायकवाड हे शहनाई आणि सुंद्री वादनाच्या परंपरा असलेल्या कुटुंबातून आले असून त्यांना वादनाचे प्रशिक्षण त्यांचे आजोबा सनईसम्राट शंकररावजी गायकवाड तसेच वडिल सुरमणी पंडित प्रभाशंकर गायकवाड आणि काका कृष्णा गायकवाड यांच्याकडून मिळाले आहे.
पुरस्कार वितरण सोडळ्यानंतर पंडित रघुनाथ खंडाळकर यांचे सुपुत्र आणि शिष्य सुरंजन व शुभम खंडाळकर यांची गायन जुगलबंदी होणार आहे.
त्यानंतर विदुषी राजश्री पाठक यांचे गायन होणार असून महोत्सवाची सांगता डॉ. पंडित संजय गरुड यांच्या गायनाने होणार आहे. पाठक या विदुषी शोभा गुर्टू यांच्या शिष्या असून उपशास्त्रीय संगीतात त्यांचे विशेष प्राविण्य आहे. पंडित गरुड हे किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आहेत. किराणा घराण्याची गायन परंपरा ते प्रवाहित ठेवत आहेत.
कलाकारांना उदय कुलकर्णी, माधव लिमये, तुषार केळकर (संवादिनी), पंडित अरविंदकुमार आझाद, रोहन पंढरपूरकर, ऋषिकेश जगताप (तबला), माऊली दुधाणे, माऊली फाटक (पखवाज) साथसंगत करणार आहेत. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.