गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘कलानिधी’चा विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्कार अतुल खांडेकर यांना जाहीर !
शनिवारी पुरस्कार वितरण : पंडित विकास कशाळकर यांच्या मैफलीचे आयोजन :!
पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करणाऱ्या तसेच युवा कलाकाराला सांगीतिक कारकिर्दीसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कलानिधी संस्थेतर्फे विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्कराने सन्मानित केले जाते. या वर्षी युवा शास्त्रीय गायक आणि संगीतकार अतुल खांडेकर यांचा विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 23 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे.
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या 75व्या जन्मदिनाचे औचित्य साधून नाद-निनाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी पुरस्काराचे वितरण पंडित विकास कशाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पुरस्कराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. अकरा हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुरुवातीस अतुल खांडेकर यांचे गायन होणार असून त्यानंतर पुरस्कार वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित विकास कशाळकर यांच्या गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे.
अतुल खांडेकर आणि पंडित विकास कशाळकर यांना प्रणव गुरव (तबला) आणि लीलाधर चक्रदेव (संवादिनी) साथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
कलानिधी संस्थेविषयी..
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका अपर्णा गुरव आणि तबला वादक मिलिंद गुरव यांनी कलानिधी या संस्थेची स्थापना 2015 साली केली. तेव्हापासून संस्थेद्वारे विविध सांगीतिक उपक्रम राबविले जातात. युवा कलाकारांना सादरीकरणाची संधी देऊन त्यांना हक्काचा स्वरमंच उपलब्ध करून देणे हे कलानिधीचे मुख्य ध्येय आहे. आजपर्यंत युवा कलाकारांसह ज्येष्ठ कलाकारांनी सुद्धा कलानिधीच्या कार्यक्रमांमधून सादरीकरण केले आहे.
आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त कलाकारांचे गायन-वादनाचे कार्यक्रम कलानिधी संस्थेने आयोजित केले आहेत. संस्थेमुळे कलाकारांना हक्काचा स्वरमंच तर मिळाला आहेच त्याच बरोबरीने चांगला श्रोतृवर्ग निर्माण होण्यासही मदत झाली आहे.
जाहिरात