गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मने फुलवायला उपयुक्त विचार साहित्यातूनच मिळतात : प्रा. मिलिंद जोशी !!
‘राग-रंग, तरंग-अंतरंग’ पुस्तकाचे प्रकाशन !!
पुणे : चित्रकला, संगीत, साहित्य या सगळ्या कलांमध्ये अंतर्संवाद असतो तो समजून घेणे आवश्यक असते. जात, पंथ, धर्म न पाहता माणूस जोडण्याचे काम कलेद्वारे होते. भावना जागवायला आणि मने फुलवायला उपयोगी पडणारे विचार साहित्यातूनच मिळतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
एकदंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शब्दशिल्पी डॉ. मुकुंद कोठावदे, राग गीतकार किरण फाटक आणि डॉ. दिलीप वाणी लिखित ‘राग-रंग, तरंग-अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील निमा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राग-रंग, तरंग-अंतरंग’ पुस्तक प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) डॉ. भीम गायकवाड, डॉ. भालचंद्र भागवत, डॉ. शरच्चंद्र हर्डीकर, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. मुकुंद कोठावदे, डॉ. भाऊसाहेब जाधव.
ख्यातनाम अस्थिव्यंगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. शरच्चंद्र हर्डीकर, राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र भागवत, मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, प्रा. डॉ. भीम गायकवाड मंचावर होते.
पुस्तकाच्या मांडणीविषयी बोलताना डॉ. कोठावदे म्हणाले, ‘राग-रंग, तरंग-अंतरंग’द्वारे मनात आनंदाचे तरंग निर्माण व्हावेत अशी अपेक्षा आहे.
किरण फाटक म्हणाले, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात खूप सामर्थ्य आहे. शास्त्रीय संगीताचा वैद्यक क्षेत्रात शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार होण्याची आवश्यकता आहे.
शास्त्रीय संगीताद्वारे अंतरंगात आनंद फुलतो, असे सांगून डॉ. दिलीप वाणी म्हणाले, प्रत्येकाला शास्त्रीय संगीत समजेल असे नाही. मात्र शास्त्रीय संगीताचा आनंद प्रत्येकजण घेऊ शकतो. पुस्तकाद्वारे संगीतातील विज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला आहे.