गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विष्णुसहस्रनामातील २५० नामांवर साडेसात वर्षांहून अधिक काळ सखोल आणि सारगर्भ प्रवचने दिल्यानंतर, १४ ऑक्टोबर २००४ रोजी सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी आणखी एका पवित्र आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली. ह्या दिवसापासून बापूंनी दिव्य अशा ‘श्रीरामरक्षा’ स्तोत्रमंत्रावर प्रवचने सुरू केली.
या प्रवचनांमध्ये सद्गुरु बापूंनी, श्रीरामनामाची महती आणि ह्या नामाचा अतुलनीय सोपेपणा स्पष्ट केला. सर्व नामांमध्ये ‘रामरक्षा’ हा रामनामाचा सर्वश्रेष्ठ स्तोत्रमंत्र आहे, असे बापूंनी प्रतिपादित केले.
पुढे सद्गुरु बापूंनी, श्रीरामरक्षा ही केवळ एक स्तोत्र किंवा मंत्र नसून ‘स्तोत्र-मंत्र’ कशी आहे हे स्पष्ट केले व स्तोत्र, मंत्र आणि स्तोत्र-मंत्र यांमधील सूक्ष्म, पण महत्त्वपूर्ण फरक समजावून सांगितले.
श्रीरामरक्षेच्या जन्माबद्दल बोलताना, सद्गुरु बापूंनी प्रथम ‘बुधकौशिक’ या नावाचा अर्थ सांगितला. बुधकौशिक ऋषी हेच ह्या दिव्य रामरक्षेचे विरचिते आहेत.
पुढे, श्रीरामरक्षा बुधकौशिक ऋषींना कशी स्फुरली हे विशद करताना बापूंनी, शिवशंकरांनी केलेली श्रीरामाची तपश्चर्या, बुधकौशिक ऋषींनी केलेली शिवशंकराची तपश्चर्या, शिवशंकर व बुधकौशिक ऋषी यांच्यातील संवाद, श्रीराम व बुधकौशिक ऋषी यांच्यातील संवाद, तसेच माता सरस्वती आणि बुधकौशिक ऋषी यांच्यातील संवाद, अशा ह्या दिव्य घटनेशी संबंधित कथा सांगितल्या. या कथा भक्तांच्या मनात रामरक्षेबद्दल एक पवित्र व प्रेमपूर्ण असे भावनिक व आध्यात्मिक नाते निर्माण करतात.
या प्रवचनाच्या अखेरीस, सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी एक सुंदर सनातन सत्य उद्घोषित केले — ‘या विश्वातील सर्व जीव एकमेकांशी जोडलेले आहेत’ व ह्या महान संकल्पनेमध्ये रामरक्षेची भूमिका काय, तेही स्पष्ट केले