गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी विश्वासार्ह माहिती संकलन होणे आवश्यक : डॉ. दीपक शिकारपूर !!
नगर रचना आणि मूल्यांकन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्र !
पुणे : राज्य सरकारच्या कामकाजास 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अतंर्गत अविनाश पाटील (संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य ) ह्यांच्या कल्पनेतून नगर रचना आणि मूल्यांकन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
डॉ. दीपक शिकारपूर यांचे स्वागत करताना अविनाश पाटील (संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य )
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ दीपक शिकारपूर हे ह्या सत्राचे मुख्य मार्गदर्शक होते .राज्यातील सुमारे 650 अधिकाऱ्यांचा यात सहभाग होता. नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स) वापरापूर्वी योग्य आणि विश्वासार्ह माहितीचे संकलन होणे आवश्यक असते. नगर रचना आणि मूल्यांकन विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना विभागाच्या आवश्यकतेनुसार परिणाम साधण्यासाठी सुयोग्य प्रॉम्पटस् वापरणे तसेच शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी स्वतंत्र विभाग विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादनडॉ. दीपक शिकारपूर यांनी केले. .
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सकारात्म पद्धतीने करा परंतु त्याला ब्रह्मवाक्य समजू नका असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि डेटा ॲनालिसीसचा कशा पद्धतीने वापर होऊ शकतो याविषयी सुहास मापारी यांनी विवेचन केले.
मान्यवरांचा परिचय रेश्मा देशकर यांनी करून दिला तर आभार नगर रचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले यांनी मानले.