गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बुधवारी ‘गंधर्वसूरांची शिलेदारी’
मराठी रंगभूमी, पुणेतर्फे नाट्यसंगीताच्या मैफलीचेआयोजन :!
पुणे : मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि गंधर्व भूषण जयराम शिलेदार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 6) नाट्यसंगीतावर आधारित ‘गंधर्वसूरांची शिलेदारी’ या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, संगीत मानापमान या नाटकांमधील पदांबरोबरच काही दुर्मिळ पदे या मैफलीच्या निमित्ताने रसिकांना ऐकायला मिळणार आहेत.
कार्यक्रम बुधवार, दि. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. संचेती ऑडिटोरियम, डॉ. नितू मांडके आयएमए हाऊस, पहिला मजला, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.मराठी रंगभूमी, पुणेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेची वाटचालही रसिकांना समजणार आहे.
1880 साली आलेल्या शाकुंतल नाटकापासून 2016 साली आलेल्या संगीत स्वरविभ्रम या पर्यंत संस्थेने विविध नाटके सादर केली आहेत. यातील काही निवडक पदे, विविध आठवणी यांचा यात समावेश आहे.
‘मम आत्मा गमला’ (संगीत स्वयंवर), ‘यती मन मम’ (संगीत ययाती देवयानी), ‘मना तळमळसी’ (संगीत शाकुंतल), ‘चंद्रिका ही जणू’ (संगीत मानापमान), ‘प्रिये पहा’ (संगीत सौभद्र) या लोकप्रिय पदांबरोबरच संगीत द्रौपदी, संगीत विद्याहरण, संगीत कालिदास अशा सध्या प्रयोग होत नसलेल्या नाटकांतील पदे सादर केली जाणार आहेत.
नाट्यगीते सादर करणार आहेत आजचे आघाडीचे गायक अभिनेते निनाद जाधव, चिन्मय जागळेकर आणि गायक अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर. लीलाधर चक्रदेव आणि अभिजित जायदे यांची साथसंगत असणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा जोगळेकर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात