गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भुवनेश कोमकली यांच्या गायनसेवेने विविद स्मृती संगीत समारोहाला सुरुवात :!
गांधर्व महाविद्यालय पुणे, गांधर्व महाविद्यालय नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन !
पुणे : पंडित कुमार गंधर्व यांचे नातू, प्रतिभावान कलावंत भुवनेश कोमकली यांच्या गायनाने 24व्या विविद संगीत समारोहाला शुक्रवारी सुरुवात झाली. पंडित कुमार गंधर्व यांच्या रचनांसह भक्तिरचनांद्वारे त्यांनी रसिकांची सायंकाळ संस्मरणीय केली.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, पंडित विनयकराव पटवर्धन व पंडित द. वि. पलुस्कर यांच्या संगीत कार्यास अभिवादन करण्याच्या हेतूने गांधर्व महाविद्यालय, पुणे व गांधर्व महाविद्यालय नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय विविद संगीत समारोह गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.
गांधर्व महाविद्यालय आयोजित 24व्या विविद स्मृती संगीत समारोहातील पहिल्या दिवशी गायनसेवा करताना भुवनेश कोमकली. समवेत आशय कुलकर्णी, कार्तिक नतवले, स्वरूपा गोडबोले, अभिषेक शिनकर
पंडित कुमार गंधर्व आणि पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या आणि पंडित गजानन बुवा जोशी यांच्या नातवंडांचे सादरीकरण या महोत्सवात होत आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (दि. 1) भुवनेश कोमकली यांचे बहारदार गायन झाले. पंडित कुमार गंधर्व यांच्या राग बिहागमधील ‘ये मोरा मन’ या रचनेने त्यांनी मैफलीची सुरुवात केली. विलंबित एकतालातील या रचनेनंतर ‘ये का मुरझायो’ ही द्रुत एकतालातील रचना सादर करून त्यांनी आपल्या स्वरांचे गारूड रसिकांवर केले.
त्यानंतर राग धनबसंतीमधील ‘दीप की जोत जरे’ ही मध्यलय तीन तालातील रचना आणि त्यानंतर राग बसंतमधील द्रुत एक तालातील ‘ये रीत है कैसो’ या रचना सादर केल्या. अशा विविध रचनांमधून कोमकली यांना परंपरेतून मिळालेला वारसा त्यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांसमोर उलगडला.
‘कैसे भरू पानी’, ‘दान तुझे कैसे जाणावे देवा’ या रचनांद्वारे त्यांनी रसिकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. कोमकली यांना आशय कुलकर्णी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), कार्तिक नवतले, स्वरूपा गोडबोले (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक दीपक नानिवडेकर आणि प्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणिकर यांच्या हस्ते झाले. सुरुवातीस गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी विविद संगीत समारोहाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, पंडित विनयकराव पटवर्धन व पंडित द. वि. पलुस्कर यांच्या कार्याची ओळख शुभांगी बहुलिकर यांनी करून दिली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 2) स्वरांगी मराठे-काळे आणि भाग्येश मराठे यांचे गायन होणार असून त्यांना पुष्कर महाजन (तबला), सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी (दि. 3) पल्लवी जोशी आणि अपूर्वा गोखले यांचे सादरीकरण होणार असून त्यांना संजय देशपांडे (तबला), प्रवीण कासलीकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
महोत्सव गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाची वेळ सायंकाळी सहा अशी आहे.
जाहिरात