गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ बालनाट्याची तुफानी शतकी खेळी..!
नाट्यसंस्कार कला अकादमीची निर्मिती : बालक-पालकांच्या प्रचंड प्रतिसादात रंगला शंभरावा प्रयोग!
पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमीची निर्मिती असलेल्या ‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ या बालनाट्याचा शंभरावा प्रयोग बालक-पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला. या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही काळापूर्वी बालकलाकार म्हणून याच नाटकात भूमिका साकारलेल्या आणि आज नावारूपाला आलेल्या कलाकारांनी पुन्हा एकदा बालपणात जाऊन काही प्रवेशातून भूमिकेचा आनंद घेतला.
‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ या बालनाट्याने गेल्या 22 वर्षांपासून अबालवृद्धांच्या मनावर गारूड करीत आज शतक पूर्ण केले. गेली 22 वर्षे हे बालनाट्य रंगभूमीवर गाजत असून प्रारंभापासून या बालनाट्यात भूमिका साकारलेले अनेक कलाकार या शंभराव्या प्रयोगाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिले. शंभराव्या प्रयोगात प्रकाश पारखी, दिपाली निरगुडकर, अरुण पटवर्धन, हर्षदा टिल्लू, शर्व दाते, श्रीजय देशपांडे यांच्या भूमिका होत्या तर सक्षम कुलकर्णी, प्रियदर्शनी इंदलकर, सूरज पारसनीस, आदिश्री देशमुख आणि ओंकार गोखले यांनी बालनाट्यातील काही प्रवेश सादर केले.
या बालनाट्याच्या शंभराव्या प्रयोगाची कलाकारांनाच नव्हे तर आजच्या बच्चेकंपनीला आणि त्यांच्या पालकानांही उत्कंठा होती. त्यामुळेच ज्या पालकांनी त्यांच्या लहानपणी या प्रयोगाची मजा लुटली होती अशा पालकांनीही या प्रयोगाला आपल्या लहानग्यांसह आवर्जून उपस्थिती लावून या चिरतरूण बालनाट्याचा मनमुराद आनंद लुटला.
सध्या भूमिका करीत असलेल्या तसेच पूर्वी भूमिका साकारलेल्या कलाकार, तंत्रज्ञांचा कौतुक सोहळा यानिमित्ताने आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध अभिनेत्री, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या निलम उदय शिर्के-सामंत, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, नाट्य परिदषेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, बालनाट्याच्या लेखक-दिग्दर्शिका विनिता पिंपळखरे, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, सुप्रसिद्ध अभिनेते आलोक राजवाडे, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर रंगमंचावर होते.
निलम शिर्के-सावंत यांनी शंभराव्या प्रयोगाला शुभेच्छा देत बालनाट्याची जादू आजही कायम आहे याविषयी आनंद वाटतो असे सांगत या निमित्ताने लहानग्यांनी काही काळ मोबाईल, रिमोट हातात न घेता निखळ आनंद लुटल्याचे जाणविले.
शंभरावे नाट्यसंमेलन आयोजित करण्याचा मान पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद शाखेला मिळाला असून या संमेलनात एक दिवस बालनाट्यासाठी असेल अशी ग्वाही भाऊसाहेब भोईर यांनी या प्रसंगी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांनी केले.
जाहिरात