गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. लिली जोशी लिखित ‘अमरुची प्रेमकविता’ पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन सोहळा !!
पुणे : प्रतिभावान संस्कृत कवी अमरु यांच्या ‘अमरुशतकम्’ या काव्याचा मराठी अनुवाद आणि रसग्रहण असलेल्या डॉ. लिली जोशी लिखित ‘अमरुची प्रेमकविता’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. 2 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
एस. एम. जोशी सभागृह, कॉन्फरन्स हॉल येथे सायंकाळी 5 वाजता पुस्तक प्रकाशन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष, ख्यातनाम लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या ‘भागवत पुराण’ संशोधन प्रकल्पाचे प्रमुख आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘पाली आणि बौद्धविद्या’ विभागातील संलग्न प्राध्यापक डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. हेमा डोळे, डॉ. ज्योत्स्ना खरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
स्त्री-पुरुष प्रेमाचा गोफ कुशलतेने विणणारा, रसराज शृंगाराची पूजा बांधणारा आठव्या शतकातील कवी म्हणजे अमरु. संस्कृत काव्यसृष्टीतील त्याचा ‘अमरुशतकम्’ हा एक प्रशंसनीय ग्रंथ आहे. या ग्रंथातून त्या काळातील भाषा, समाज आणि रुढीपरंपरा यांचा एकत्रित मेळ झालेला दिसून येतो.
परंतु कालिदासाच्या तोडीसतोड असणारा हा कवी मराठी वाचकांना काहीसा अपरिचित राहिला आहे. ‘अमरुची प्रेमकविता’ या पुस्तकातून डॉ. लिली जोशी यांनी अपरिचित कवीच्या संस्कृत कवितेचा अत्यंत रोचक परंतु सुलभ मराठीत रसास्वादी अनुवाद केला आहे.
डॉ. लिली जोशी या वैद्यकशास्त्रातील प्रथितयश डॉक्टर असून कन्सल्टिंग फिजिशिअन म्हणून अनेक वर्षांपासून पुण्यात कार्यरत आहेत. उन्मेष प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे.
जाहिरात