गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन!
‘यम्मी मम्मी’ स्किटला विनोदवीर सतीश तारे करंडक !!
अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांचा पहिल्या विनोदवीर सतीश तारे पुरस्काराने गौरव !
पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय विनोदवीर सतीश तारे करंडक स्किट स्पर्धेत जोकर्स थिएटरने सादर केलेल्या ‘यम्मी मम्मी’ या स्किटने सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावित करंडकावर नाव कोरले. संघाला 20 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
कल्पक नाट्य मंडळाच्या ‘अदला बदली’ला द्वितीय तर सूर्यादय कला मंचच्या ‘व्यथा’ या स्किटला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. या संघांना अनुक्रमे पंधरा आणि दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदवीर सतीश तारे स्किट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या जोकर्स थिएटर्सच्या ‘यम्मी मम्मी’ या स्किटमधील कलाकारांसह पुष्कर श्रोत्री, सागर कारंडे, प्रभाकर मोरे, सिद्धेश्वर झाडबुके, शरद तांदळे, सचिन नगरकर, विजय पटवर्धन आदी.
स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष होते. स्पर्धेत राज्यातील 29 संघ सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीतून निवडलेल्या नऊ संघांची अंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर विजेत्या संघांची घोषणा करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
अंतिम फेरीचे परिक्षण सिद्धेश्वर झाडबुके, सागर कारंडे आणि प्रभाकर मोरे यांनी केले. पारितोषिक वितरण प्रसंगी शरद तांदळे, सचिन नगरकर, विजय पटवर्धन, साधना बेंद्रे, राजेश गाडगीळ रंगमंचावर होते.
प्रसिद्ध अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांना पहिल्या विनोदवीर सतीश तारे पुरस्काराने या वेळी गौरविण्यात आले.
स्पर्धकांशी संवाद साधताना पुष्कर श्रोत्री म्हणाले, या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक कलावंत, लेखक, तंत्रज्ञ पुढे येत आहेत. त्यांनी विविध माध्यमांचा अभ्यास करून त्यात सहभागी होऊन प्रामाणिकपणे मेहनत करत यशस्वी व्हावे. विजय पटवर्धन फाऊंडेशनने सुरू केलेल्या स्पर्धेमुळे सतिश तारे यांचे काम सदैव स्मरणात राहील.
सागर कारंडे यांनी परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.पुरस्काराला उत्तर देताना सिद्धेश्वर झाडबुके म्हणाले, विनोदवीर सतीश तारे यांच्या नावे मिळालेला पुरस्कार हा माझा खूप मोठा सन्मान आहे. सतीश तारे यांच्यासह काम करताना त्यांच्याकडून अभिनयातील अनेक बारकावे शिकायला मिळाले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
दिग्दर्शन : प्रथम नवलाजी जाधव (व्यथा), द्वितीय मनोज झुंगा (आधुनिक बाबागिरी), तृतीय राहुल काळोखे (अदला बदली).
लेखन : प्रथम स्वप्निल जगताप (यम्मी मम्मी), द्वितीय ज्योती भावे (ढगांनो शांत व्हा), तृतीय राहुल काळोखे (अदला बदली).
अभिनय : पुरुष : प्रथम राहुल काळोखे (अदला बदली), द्वितीय राहुल भालेराव (व्यथा), तृतीय मनोज झुंगा (आधुनिक बाबागिरी).
अभियन : स्त्री : प्रथम अक्षता साळवी (यम्मी मम्मी), द्वितीय श्रावणी धुमाळ (रात्रीस खेळ चाले), तृतीय अनुजा चौधरी (अदला बदली).
अंतिम फेरीतील उत्तेजनार्थ पारितोषिके : अभिनय : शरीफ पठाण (चोरावर मोर), आकाश कुलकर्णी (चोरावर मोर), प्रिया उंडे (आजुडी छकुडी), अभिषेक शिंदे (आधुनिक बाबागिरी), विघ्नराजेंद्र निकम (रात्रीस खेळ चाले), बळी डिकळे (व्यथा), नयन सप्रे (चुपचुपके चोरी चोरी).
प्राथमिक फेरीत उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालेले कलाकार : अभिनय : वैशाली सवने (त्रिरंग थिएटर्स), अर्चिस थत्ते (नाट्यसंकुल, पुणे), अरविंद पांचाळ (दृष्टी, पुणे), सुप्रिया गोसावी (भुसारी कॉलनी नाट्य कलामंच), मृणाल देशपांडे (ऱ्हस्व दीर्घ कलांगण), अभिजीत केंगार (थिएटरकर, सोलापूर), प्रसाद चव्हाण (शेवटचा कलाकार), प्रज्योत म्हेत्रे (वैभवदीप नाट्यसंस्था), रितेश पिटले (रंगभूमी थिएटर), अभिषेक चांडोले (श्लोक आरुष एंटरटेनमेंट), स्नेहल पावसकर (दृष्टी, पुणे), तेजस राजे (लाईम लाईट महाराष्ट्र, पुणे), अर्जुन गोखले (नाटकवादी संघ, पुणे), वैभव महाले (दृष्टी, पुणे), श्वेता कुलकर्णी (रागी ग्रुप पुणे).
जाहिरात