गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदवीर सतीश तारे करंडक स्किट स्पर्धेला सुरुवात !
पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदवीर सतीश तारे करंडक राज्यस्तरीय स्किट स्पर्धेला आज (दि. 19) सुरुवात झाली. स्पर्धेत राज्यातील एकूण 29 संघ सहभागी झाले आहेत. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघ निवडले जाणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
स्पर्धेचे उद्घाटन युवा अभिनेता अथर्व सुदामे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सतीश तारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन, परीक्षक चेतन चावडा, आनंद जोशी, योगिनी पोफळे तसेच ज्येष्ठ अभिनेते श्रीराम रानडे उपस्थित होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 19 व 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात एस. एम. जोशी सभागृहात तर अंतिम फेरी दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता भरत नाट्य मंदिरात होणार आहे.
विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित विनोदवीर सतीश तारे करंडक स्किट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित चेतन चावडा, आनंद जोशी, विजय पटवर्धन, अथर्व सुदामे, श्रीराम रानडे, योगिनी पोफळे.
अंतिम फेरीनंतर लगेच पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे विजय पटवर्धन यांनी प्रास्ताविका सांगितले.स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास 20 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकाच्या संघास 15 हजार तर तृतीय क्रमांकास 10 हजार रुपयांचे पारितोषिक, मानचिन्ह देण्यात येणार आहे.
सर्वोकृष्ट लेखन आणि दिग्दर्शनासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, सर्वोकृष्ट विनोदवीर स्त्री आणि पुरुष कलाकारासाठी प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘सतीश तारे स्मृती पुरस्कार’ही प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या वेळी बोलताना श्रीराम रानडे म्हणाले, विनोदाद्वारे निखळ आनंद मिळणे आज फार दुरापास्त झाले आहे. कलेच्या माध्यमातून रसिकांना खळखळवून हसविणाऱ्या सतीश तारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्पर्धांचे आयोजन करून विजय पटवर्धन फाऊंडेशनने सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. रसिकांना मनमुराद हसविणे हे खऱ्या अर्थाने पवित्र कार्य आहे.
अथर्व सुदामे म्हणाले, स्पर्धेमुळे कलाकारांना सादरीकरणासाठी एक चांगला मंच उपलब्ध झाला आहे. कलाकारांनी या संधीचे सोने करावे आणि रसिकांना हास्याचा आनंद द्यावा.चेतन चावडा यांनी सतीश तारे यांच्या समवेतच्या दौऱ्यादरम्यानच्या आठवणी सांगितल्या.
सतीश तारे यांच्या सारखा विनोदी कलाकार होणे नाही, असे आनंद जोशी म्हणाले. स्पर्धकांनी सतीश तारे यांच्या अभिनयाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सादरीकरण करा, अशा शब्दांत त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
विजय पटवर्धन फाऊंडेशनने कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी उत्तम मंच उपलब्ध करून दिला आहे या बद्दल फौंडेशनेचे कौतुक करून योगिनी पोफळे यांनी कलाकारांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
जाहिरात