गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ बालनाट्याची शतकी वाटचाल!
100वा ऐतिहासिक प्रयोग रंगणार सोमवारी !
पुणे : प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या क्षेत्रात 44 वर्षांपासून कार्यरत असलेल्या नाट्यसंस्कार कला अकादमीची निर्मिती असलेल्या ‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ या बालनाट्याने गेल्या 22 वर्षांपासून अबालवृद्धांच्या मनावर गारूड करीत शतकाच्या उंबरठ्यावर प्रवेश केला आहे. नाट्यसंस्कार कला अकादमीची निर्मिती असलेल्या या दोन अंकी बालनाट्याचा शंभरावा प्रयोग दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित केल आहे,
अशी माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या बालनाट्याच्या लेखिका आणि दिग्दर्शिका विनिता पिंपळखरे यांची उपस्थिती होती.
शंभराव्या प्रयोगाला सुप्रसिद्ध अभिनेत्री, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्या निलम उदय शिर्के-सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग 12 एप्रिल 2001 रोजी सादर करण्यात आला. या बालनाट्याची संकल्पना प्रकाश पारखी यांची आहे. प्रकाश पारखी आणि दिपाली निरगुडकर यांनी पहिल्या प्रयोगात आई-बाबांचे काम केले होते आणि शंभराव्या प्रयोगातही ते काम करत आहेत.
सुरुवातीला प्रेरणा पारखी, प्रतीक पारखी व प्रतिक बेल्हद यांनी यातील प्रेरणा, प्रतीक आणि गोट्या या पात्रांच्या भूमिका साकारल्या. त्यानंतर 22 वर्षांत बऱ्याच कलाकारांनी या भूमिका केल्या. त्यातील काही कलाकार आज अभिनय, सिनेमा क्षेत्र गाजवत आहेत.
‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ या बालनाट्याचे पुण्यातील सर्व नाट्यगृहात प्रयोग झालेच पण सारसबाग आणि ताथवडे उद्यानातही याचे प्रयोग झाले. जुन्नरसारख्या छोट्या गावापासून ते ठाणे, कोल्हापूर, सांगली, मिरज, इचलकरंजी, सातारा, कराड, सांगोला, सोलापूर, बिड, संगमनेर, औरंगाबाद, बारामतीसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याचे प्रयोग झाले आहेत.
2003 मध्ये रौप्य महोत्सव तर 2009 मध्ये पन्नासावा प्रयोग झाला. प्रयोग क्रमांक 99 तर मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी झाला. या बालनाट्याची डीव्हीडी पण लोकप्रिय झाली. या बालनाट्याच्या लेखनाबद्दल महाराष्ट्र शासनाचा लेखन पुरस्कार विनिता पिंपळखरे यांना मिळाला आहे.
करोनाच्या काळात हे बालनाट्य द बॉक्समध्ये चित्रित होऊन इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील रसिकांपर्यंत ऑनलाईन पोहोचले. वातानुकूलित सुसज्ज नाट्यगृहात बॉक्स सेट लावून याचे प्रयोग झाले, तर मागे पडदाही नसताना खुल्या रंगमंचावरही याचे प्रयोग झाले आहेत. एक प्रयोग तर ग्रामीण भागातील एका जत्रेमध्ये सादर करण्यात आला.
या बालनाट्यात भूमिका केलेले सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, सुरज पारसनीस, ओंकार गोखले, प्रियदर्शनी इंदलकर हे आज आघाडीचे कलाकार आहेत. पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना संभाळणारे संजय दावरा, मयुरेश्वर काळे, तेजस देवधर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, आघाडीचे प्रकाशयोजनाकार झाले आहेत.
शंभराव्या प्रयोगाच्या निमित्ताने हे सर्व कलाकार एकत्र येणार आहेत आणि 100व्या प्रयोगात सादरीकरण देखील करणार आहेत. रसिकांसाठी प्रयोगाच्या प्रवेशिका नाट्यसंस्कार कला अकादमीच्या कार्यालयात मोफत उपलब्ध आहेत.
जाहिरात