Marathi FM Radio
Sunday, April 20, 2025

‘फुलपंखी डोळ्यातील मोरपंखी गुन्हा’ मांडणाऱ्या कवितांना मिळाली दाद !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

‘फुलपंखी डोळ्यातील मोरपंखी गुन्हा’ मांडणाऱ्या कवितांना मिळाली दाद !!

‘करम कोलाज’मधून मानवी भावनांचा काळीजकल्लोळ

पुणे : वसंत ऋतूमधील उत्फुल्ल निसर्गरंगांचे मानवी जीवनातले अनेक अंश, विविध कविता आणि गझलांच्या माध्यमातून रविवारी प्रकट झाले. सहा कवयित्रींनी साकारलेला हा विविध भावभावनांचा कल्लोळ करम कोलाजच्या व्यासपीठावरून रसिकांनी अनुभवला आणि मनमोकळी दादही दिली.

Advertisement

Advertisement

निमित्त होते ‘करम प्रतिष्ठान’ आयोजित नामवंत कवयित्रींच्या सुश्राव्य कविता व गझलांच्या मैफिलीचे. ‘करम कोलाज’ या शीर्षकांतर्गत सादर झालेल्या या मैफिलीत प्राजक्ता पटवर्धन, निरुपमा महाजन, वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, वैशाली माळी आणि चिन्मयी चिटणीस या कवयित्रींनी कविता, गझल सादर केल्या. कर्वे रस्त्यावरील सावरकर अध्यासन केंद्र येथे ही मैफिल रंगली.

Advertisement

करम कोलाज संकल्पनेविषयी करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर म्हणाले, आजच्या काळात मराठी भाषेत अत्युत्कृष्ट काव्यलेखन होत आहे. हे अस्सल काव्य लेखन रसिकांसमोर येणे अतिशय गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होणे यात अनेक महान व्यक्तींचे प्रयत्न आहेत.

Advertisement

करम प्रतिष्ठान आयोजित करम कोलाज कार्यक्रमात सहभागी (डावीकडून) वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, प्राजक्ता पटवर्धन, निरुपमा महाजन, वैशाली माळी, चिन्मय चिटणीस.

मात्र त्या दर्जाच्या योग्यतेचे लेखन करणाऱ्या कवयित्रींच्या कविता एकत्रित स्वरूपात जनमानसापुढे आणण्याचे काम करम प्रतिष्ठान करत आहे. रसिक या प्रयोगाला उत्कट दाद देत आहेत.

यावेळी बाबूल पठाण, अविनाश सांगोलेकर, ज्योत्स्ना चांदगुडे, सुवर्णा सोहोनी, अलका साने तसेच आनंदी वृद्धाश्रमाच्या संचालिका रोहिणी ताकवले आणि त्यांचे सहकारी महेंद्र वांजळे यांचा सत्कार करण्यात आला. ऋचा कर्वे यांनी कवयित्रींचा परिचय करून दिला. प्रज्ञा महाजन, वासंती वैद्य, मुक्ता भुजबले यांनी संयोजन केले तर शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

सहाही कवयित्रींच्या कविता, गझलांमधून मानवी प्रेमभावना, निसर्ग, ऋतू, हळव्या प्रेमभावनांचे मोरपिशी सूर तर प्रकट झालेच, पण कुटुंब, नाती, घराचा जिव्हाळा, दूरदेशी उडून गेलेली पाखरे, त्यांच्याविना सुनी झालेली आईवडिलांची भावविश्वे, आई, बाबा या आत्मीय नात्यांचे अनेक पदरही उलगडत गेले. या कवितांनी रसिकांना कधी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलविले तर कधी गहिवरून टाकले.

किती दिवस अबोला
असा घेणार शब्दांनो,
गोड कवितेची ओळ
कधी येणार शब्दांनो, असा प्रश्न चिन्मयी चिटणीस यांना पडला होता, तर

वासे फिरले तशी माणसे निघून गेली फ्लॅटवर
चोवीस तास राबूनसुद्धा फ्लॅट बनला नाही घर, असा साक्षात्कार वैशाली माळी यांनी कवितेतून मांडला. वैशाली यांच्या कवितेतील
फुलपंखी डोळ्यातील मोरपंखी गुन्हा
काळजाच्या ओसरीला येई पुन्हा पुन्हा, या कवितेनंही दाद मिळवली.

वैजयंती आपटे यांच्या कवितेतून
उत्सव माझा हिरवाईचा
नयनांमध्ये तुझ्याच हसला
ऋतू फुलांचे फुलवत येता
बहर तुला मी बहाल केला, असे प्रीतीचे, समर्पणाचे आणि निसर्गाचे अनोखे एकरूपत्व प्रकट झाले.

प्राजक्ता पटवर्धन यांच्या कवितेतून,
दूर चालला लेक उडूनी उंच भरारी घेण्या
घरटे स्मरते त्याच्या साऱ्या हळव्या बालकहाण्या, या शब्दांतून घरोघरची पाखरे उडून जाताना इथेच राहणार्या आईवडिलांचे कातर मन व्यक्त झाले.

निरुपमा महाजन यांनी जत्रा या कवितेतून लेक जरा नजरेआड झाल्यावर बाबाच्या मनाची जी उलघाल होते, त्याचे प्रत्ययकारी चित्रण केले होते.

गेलीच कशी अवचीत सोडुनी हात घट्ट धरलेला
जाणुनी जगाची रीत कल्पनातीत बाप भ्यालेला, या त्यांच्या ओळी रसिकांना अंतर्मुख करून गेल्या.

प्राजक्ता वेदपाठक यांची आई ही कविता तर रसिकांच्या नेत्रकडा पाणावणारी होती.

काय लिहू आईवर
आई शब्दात मावेना
आई अवकाश खुले
माझा परीघ पुरेना, या त्यांच्या शब्दांनी सुरुवातीला पकड घेतली.

आई चव अमृताची
जन्मभर उरणारी
आई प्रार्थनेची ओळ
घरभर तेवणारी, या ओळी मनात साठवतच या मैफिलीची सांगता झाली.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular