गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘गीता अनुभूती’द्वारे तत्त्वबोध आणि आत्मबोधाची प्रचिती : डॉ. राम साठ्ये
प्रदीप चंद्रचूड लिखित ‘गीता अनुभूती’ पुस्तकाचे प्रकाशन !!
पुणे : संतांनी भगवत् गीता आपल्या तत्त्वज्ञानाच्या मांडणीचा पाया म्हणून उपयोगात आणली आहे. तत्त्वसंवादातून होणारा तत्त्वबोध, त्या बोधातून होणारा आत्मबोध प्रदीप चंद्रचूड यांच्या रचनांमधून जाणवत आहे. भगवत् गीतेची अनुभूती त्यांनी लिहिलेल्या ‘गीता अनुभूती’ या श्लोकात्मक निरुपणातून प्रकट होत आहे, असे प्रतिपादन दासबोधाचे अभ्यासक, प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट डॉ. राम साठ्ये यांनी केले. भगवत् गीतेच्या अभ्यासातून आणि प्रदीर्घ चिंतनातून चंद्रचूड यांनी पुस्तकाची निर्मिती केली आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
: ‘गीता अनुभूती’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) प्रिती चंद्रचूड, प्रदीप चंद्रचूड, शोभा चंद्रचूड, डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. रवींद्र प्रभूदेसाई, डॉ. राम साठ्ये, डॉ. हिमांशु वझे, सुधाकर जोशी, दीप्ती चंद्रचूड.
प्रदीप चंद्रचूड लिखित आणि उत्कर्ष प्रकाशन प्रकाशित ‘गीता अनुभूती’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 15) डॉ. साठ्ये यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पितांबरीचे व्यवस्थापकीय सांचलक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, स्वरूपयोग प्रतिष्ठानचे डॉ. हिमांशु वझे, गीता अभ्यासक डॉ. अनुराधा कुलकर्णी, प्रकाशक सुधाकर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. एरंडवणे येथील सेवा भवनातील मुकुंदराव पणशीकर सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुस्तकाच्या निर्मितीविषयी बोलताना प्रदीप चंद्रचूड म्हणाले, भगवत् गीतेद्वारे आपल्याला जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मिळते. सर्वसामान्य लोकांना गीतेसारख्या असामान्य ग्रंथातून काय शिकायचे आणि आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला कसे तोंड द्यायचे याच्या आलेल्या अनुभवातून ‘गीता अनुभूती’ पुस्तकाचे लिखाण झाले आहे.
या वेळी डॉ. राम साठ्ये यांचे दासबोध व भगवत् गीता या विषयावर व्याख्यान झाले.
पुस्तकाविषयी बोलताना डॉ. अनुराधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘गीता अनुभूती’ हे पुस्तक अतिशय सरल प्रांजल भाषेत गीतेवरील व्याख्यान आहे. मित्र परिवाराशी केलेले हितगुज आहे. भगवत् गीतेचे सार मांडताना केलेले विवेचन बोजड, अनाकलनीय वाटत नाही. अध्यात्मापर्यंत पोहोचण्याचा मार्ग या पुस्तकाद्वारे मिळू शकतो. त्या पुढे म्हणाल्या, भगवत् गीतेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यामुळे त्यातील सौंदर्य प्रत्येकाला नव्याने जाणवते.
डॉ. हिमांशु वझे म्हणाले, भगवत् गीतेवर लिखाण करणे ही सोपी गोष्ट नाही. विविध ग्रंथांचा संदर्भ घेऊन, चिंतन करून ‘गीता अनुभूती’ या पुस्तकाचे लिखाण केले गेले आहे. विशेषत: सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत केले गेलेले लिखाण गुरूकृपेमुळेच शक्य झाले आहे. भगवत् गीता ही गुरू-शिष्य संवाद असून अनुभूतीचे शास्त्र आहे.
काळाला सुसंगत अशा पद्धतीने तत्त्वज्ञानाची मांडणी सरळ सोप्या भाषेत प्रदीप चंद्रचुड यांनी केली असल्याचे डॉ. रवींद्र प्रभूदेसाई म्हणाले. सुधाकर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत शोभा चंद्रचूड, प्रदीप चंद्रचूड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती चंद्रचूड यांनी केले तर आभार प्रिती चंद्रचूड यांनी मानले.