Marathi FM Radio
Wednesday, March 12, 2025

स्वानंदी क्रिएशनतर्फे महानंदा मुखडे, शिल्पा सबनीस यांचा तपस्या पुरस्काराने गौरव !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

यशस्वी होण्यासाठी स्त्रीला संघर्ष अटळच : डॉ. माया तुळपुळे

स्वानंदी क्रिएशनतर्फे महानंदा मुखडे, शिल्पा सबनीस यांचा तपस्या पुरस्काराने गौरव !

बाह्य रूपापेक्षा अंगभूत गुण, ज्ञान चिरंतन टिकणारे : डॉ. माया तुळपुळे
तपस्या पुरस्काराची अनोखी संकल्पना कौतुकास्पद : डॉ. माया तुळपुळे !!

पुणे : स्त्रियांकडे अंगभूत चिकाटी आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद असते. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्त्रियांना संघर्ष करावा लागतो. आपल्यातील उणिवा, कमतरता यावर मात करत प्रत्येक स्त्रीने खंबीर असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सचिव आणि महिला शाखा अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे यांनी केले.

Advertisement

सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीला खंबीर साथ देणाऱ्या स्त्रीचा तपस्या पुरस्काराने सन्मान करणे ही अनोखी व कौतुकास्पद संकल्पना आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Advertisement

Advertisement

स्वानंदी क्रिएशन आयोजित तपस्या पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) अपर्णा केळकर, डॉ. माया तुळपुळे, शिल्पा सबनीस, महानंदा मुखडे, जयंत भीमसेन जोशी, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, मकरंद केळकर.

Advertisement

कला-साहित्य-सामाजिक कार्य या क्षेत्रात लक्षणीय कर्तृत्व गाजविणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी अव्याहतपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचा स्वानंदी क्रिएशनतर्फे महानंदा पांडुरंग मुखडे आणि शिल्पा मिलिंद सबनीस यांचा आज (दि. 7) तपस्या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Advertisement

श्रीराम लागू रंगअवकाश सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुखडे आणि सबनीस यांचा गौरव डॉ. माया तुळपुळे आणि ज्येष्ठ चित्रकार जयंत भीमसेन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. रोख रक्कम आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या संयोजक, प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद करताना सामाजिक आणि कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक पुरुषामागे ठामपणे उभ्या असलेल्या स्त्रीचा सन्मान करताना घराघरात या स्नेहाची, कृतज्ञतेची ज्योत तेवत रहावी आणि घरातील स्त्रीचा आदर-सन्मान व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे सांगितले.

डॉ. माया तुळपुळे पुढे म्हणाल्या, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व आहे. बाह्य रूपापेक्षा आपल्यातील अंगभूत गुण महत्वाचे असून हे गुण, शिक्षण आणि ज्ञान चिरंतन टिकणारे असते.

जयंत जोशी म्हणाले, पुरुषामागे खंबीरपणे उभे राहून साथ देणाऱ्या स्त्रीचा सत्कार हा विशेष प्रसंग आहे. मी कलावंताच्या घरात वाढल्याने अशा घरांमधील संघर्ष आणि आनंद मी जवळून अनुभवले आहे.

माझ्या आईने माझ्या वडिलांना तसेच संसाराला किती समर्थपणे सांभाळले याची मला पूर्णपणे जाणीव आहे. कलावंत म्हणून वडिलांचे मानसिक स्वास्थ्य आईने कायम जपले. एक कलाकार म्हणून माझ्या वडिलांना साजेशी ओळख व प्रतिष्ठा मिळावी हीच तिची कायम अपेक्षा असे.

सत्काराला उत्तर देताना महानंदा मुखडे म्हणाल्या, माझे आयुष्य एखाद्या प्रवाहासारखेच होते. या प्रवासात मी मागच्या वळणावरती येऊन गेलेल्या घाटाचा विचार न करता पुढे काय येते आहे याचा शोध घेतला.

प्रत्येक वळणाच्या अलिकडे मला एक सुंदर मंदिर दिसले आणि त्या मंदिरातील पावले धुता-धुता माझ्या जीवनाचा प्रवास चालू राहिला. परमेश्वराने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी मोठ्या आनंदाने पार पाडत आहे.

शिल्पा सबनीस म्हणाल्या, वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषामागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या स्त्रीयांसाठी हा पुरस्कार असला तरी लोकांच्या भाषेत लष्कराच्या भाकरी भाजणाऱ्या पतीच्या कामात मी भाकऱ्या भाजण्याचे काम करून सहयोग देत आहे.

यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते या प्रसिद्ध वाक्या प्रमाणेच सूची या क्लिष्ट विषयात काम करताना माझे पती माझ्या यशाच्या मागे ठामपणे उभे आहेत. कला, संशोधन अशा सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना सांभाळणे थोडे कठीण असले तरी निश्चितच आनंददायी आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात श्रद्धा मुखडे यांच्या कथक नृत्याचे सादरीकरण झाले. त्यानंतर कौशिक केळकर यांचे एकल तबलावादन झाले. त्यांना अमेय बिच्चु यांची लेहरा साथ केली. कलाकरांचा सत्कार संजय पंडित यांनी केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले तर आभार मकरंद केळकर यांनी मानल.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular