गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्वरझंकार म्युझिक अकॅडमी व झपूर्झा म्यूझियम ऑफ आर्ट अँड कल्चरतर्फे शनिवार-रविवारी झपूर्झा येथे स्वरदीपावलीचे आयोजन !
शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन तर तेजस व राजस उपाध्ये यांचे व्हायोलिन आणि प्रतिक राजकुमार यांचे गिटार वादन !
पुणे : पुणेकर रसिकांसाठी प्रथितयश कलाकारांच्या मैफलींचे आयोजन करणाऱ्या स्वरझंकार म्युझिक अकॅडमीतर्फे येत्या शनिवारी आणि रविवारी कुडजे येथील निसर्गरम्य अशा झपूर्झा येथे स्वरदीपावलीचे आयोजन करण्यात आले आहे.
दोनही दिवस स्वरमैफलीची सुरुवात सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. शनिवार, दि. 11 रोजी पहिल्या सत्रात युवा गिटारवादक प्रतिक राजकुमार यांचे शास्त्रीय वादन होणार असून त्यांना सागर पटोकर (तबला) आणि दीप (काहोन) साथसंगत करणार आहेत. दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक जयतीर्थ मेवुंडी यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना पांडुरंग पवार (तबला) आणि उदय कुलकर्णी (हार्मोनियम) साथसंगत करणार आहेत.
स्वरमैफलीच्या दुसऱ्या दिवशी, रविवार, दि. 12 रोजी पहिल्या सत्राची सुरुवात प्रसिद्ध युवा व्हायोलिन वादक तेजस व राजस उपाध्ये यांच्या सादरीकरणाने होणार असून त्यांना अमन वरखेडकर (की-बोर्ड) आणि अनुराग अलुरकर (तबला) साथसंगत करणार आहेत. दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा आणि स्वरमैफलीचा समारोप प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र आणि शिष्य पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना उदय कुलकर्णी (हार्मोनियम) आणि सुभाष कामत (तबला) साथसंगत करणार आहेत.
या कार्यक्रमास गार्गी बाय पी. एन. गाडगीळ अँड सन्स ट्रिब्युट टू आर्ट अँड कल्चर, लोकमान्य मल्टीपर्पज यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.रसिकांसाठी स्वरदिपावलीचे विनामूल्य आयोजन करण्यात आले असून रसिकांनी प्रकाशोत्सवाचा अर्थात दिवाळीचा आनंद स्वरमैफलीद्वारे द्विगुणित करावा.
असे आवाहन स्वरझंकारचे तेजस उपाध्ये यांनी केले आहे.
जाहिरात