गोल्डन आय न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत निराधार मुलांना फराळवाटप !
अल्पसंख्यांक समाजातील मुलांच्या खाऊच्या पैशातून फराळवाटप !!
पुणे : गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत असलेल्या भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळाने दिवाळी अर्थात प्रकाशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत वंचित, निराधार मुलांना फराळाचे वाटप करून एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
नारायणपूर आनंदग्राम गुरुकुलातील मुलांना दिवाळी फराळ देतांना अल्पसंख्यांक समाजातील मुले. समवेत महेश सुर्यवंशी, पियुष शहा, बंडूशेठ गावडे, प्रल्हाद थोरात, गोविंदा वरांदानी आणि मंडळाचे पदाधिकारी.
मंडळाच्या कार्यालयात हा अनोखा उपक्रम रविवारी (दि. 5) आयोजित करण्यात आला होता. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शहा य यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे विश्वस्त महेश सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भवानी पेठेतील अल्पसंख्यांक समाजातील मुलांनी साठविलेल्या खाऊच्या पैशातून नारायणपूर येथील आनंदाश्रम गुरुकुलातील निराधार वारकरी मुलांना फराळ, आकशकंदिल, दिवे, उटणे, सुगंधी तेल भेट दिले. आनंदग्राम गुरुकुलचे हभप तेजस महाराज कोठावळे, श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, कार्यध्यक्ष गोविंदा वरांदानी, अयाज खान, सुहास जगताप, गणेश गोळे, सुधीर अदमुळवार, निसार शेख, बंडूशेठ गावडे या वेळी उपस्थित होते.
हभप तेजस महाराज कोठावळे म्हणाले, गणेश मंडळाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या श्री शिवाजी मित्र मंडळाने आनंदाश्रम गुरुकुलातील निराधार मुलांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली आहे. दिवाळीनिमित्त मुलांना अशा प्रकारची भेट प्रथमच मिळाली आहे.
महेश सुर्यवंशी यांनी प्रबोधनात्मक गोष्टीच्या माध्यमातून संवाद साधत सकारात्मकता आणि संकटकाळी मदतीचा हात दिल्याने मिळणारे समाधान याविषयी मुलांना अवगत केले.
पियुष शहा म्हणाले, राष्ट्रीय एकात्मता, प्रेम, बंधुभाव, स्नेह निर्माण होणे हेच आपल्या सणांचे महत्त्व आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण संपूर्ण देशात होईल, असा मला विश्वास आहे.
श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात यांनी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. बंडूशेठ गावडे यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
जाहिरात