गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कालप्रहराच्या सीमा ओलांडून दिग्गज कलाकारांचे भावपूर्ण सादरीकरण !
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित रागप्रभा संगीतोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
पुणे : राग यमन, हंसध्वनी, पूरिया, दरबारी, अभोगी, हेमंत, चंद्रकंस, नंद असे सायंकाळ ते उत्तररात्र या कालाधवीत गायले जाणारे राग आज सकाळच्या तीन प्रहरात ऐकायला मिळाले. कालप्रहराच्या सीमा ओलांडून दिग्गज कलाकारांनी भावपूर्णतेने केलेल्या सादरीकरणास रसिकांनी तन्मयतेने दिलेली साथ हे रागप्रभा संगीतोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.
राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‘रागप्रभा संगीतोत्सवा’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज (दि. 2) आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या पहिल्या सत्रात पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित उदय भवाळकर, विदुषी पद्मा तळवलकर, पंडित राजा काळे, पंडित राम देशपांडे यांचे सादरीकरण झाले.
संगीतोत्सवाचे उद्घाटन पंडित हरिप्रसाद चौरसिया. पंडित उदय भवाळकर, पंडित राजा काळे, पंडित योगेश समसी, पंडित विनायक तोरवी, पंडित राम देशपांडे, रघुवीर कुलकर्णी, अशोक वळसंगकर यांच्या उपस्थितीत झाले.
ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी मैफलीची सुरुवात राग यमनने केली. त्यानंतर हंसध्वनी राग सादर केला. पंडित चौरसिया यांच्या सुमधूर वादनाने रसिकांना मोहित केले. पंडित योगेश समसी (तबला), मृणाल उपाध्याय (पखावज) यांनी साथसंगत केली तर अमर ओक, वैष्णवी जोशी, किरण बिश्त यांनी बासरी सहवादन केले.
त्यानंतर सुप्रसिद्ध ध्रुपद गायक पंडित उदय भवाळकर यांनी आपल्या धीरगंभीर आवाजात राग पूरिया ऐकविला. ‘शिव पार्वतीनाथ महाराज’ या पारंपरिक बंदिशीत आलाप, चौताल सादर केला. नंतर ‘भवानी माता काली’ ही रचना अतिशय प्रभावीपणे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित भवाळकर यांना प्रताप आव्हाड (पखावज), मेघना सरदार, किरत सिंग यांनी सहगायन व तानपुरा साथ केली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांनी आपल्या मैफलीची सुरुवात उत्तर रात्री गायला जाणाऱ्या राग दरबारीने केली. ‘मुबारक बात’ ही बंदिश विलंबित तालात सादर करून त्याला जोडून ‘अनोखा लाडला’ ही द्रुत बंदिश ऐकविली. राग अभोगीमधील ‘सपनेमे आए श्याम’, ‘लाज रखो मोरी’ या पारंपरिक बंदिशींना रसिकांनी भरभरून दाद दिली. सुयोग कुंडलकर (संवादिनी), ऋषिकेश जगपात (तबला), अंकिता दामले, निर्मला थोरात, रसिका गरूड (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या पुढील भागात सुप्रसिद्ध गायक पंडित राजा काळे यांनी राग हेमंत व चंद्रकंस सादर केला. ‘कहा मन लागों तेरो बालमवा’, ‘तोरे बिना बरन भयो’ या पारंपरिक बंदिशी प्रभावीपणे सादर केल्या. राग चंद्रकंसमधील कृष्णाला उद्देशून रचलेली ‘याहु जानी तम की करा’ ही रचना ऐकविली. अरविंदकुमार आझाद (तबला), चैतन्य कुंटे (संवादिनी), श्याम जोशी, अमृता काळे (सहगायन, तानपुरा) यांनी समर्पक साथ केली.
पहिल्या सत्राची सांगता ग्वाल्हेर-जयपूर घराण्याची तालीम मिळालेल्या पंडित डॉ. राम देशपांडे यांच्या गायनाने झाली.
पंडित देशपांडे यांनी मैफलीची सुरुवात राग नंदने केली. या रागातील ‘सैंया तोसे सकल बन ढुंढू’ ही पारंपरिक बंदिश ऐकवून नंतर आग्रा घराण्यातील ‘रहे रैन पिया सौतन’ ही रचना रसिकांची दाद मिळवून गेली. नागपूर येथील तबला वादक सचिन बक्षी यांची रचलेला ‘तान ते रे दानी’ तराणा ऐकवून रसिकांना आनंदीत केले. प्रशांत पांडव (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), गंधार देशपांडे, सिद्धार्थ गोडांबे, मयूर कोळेकर यांनी गायन साथ केली.
रागप्रहरांच्या कालबाह्य संकल्पनातून मुक्त संगीताविषयी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केलेल्या भावना दृकश्राव्य माध्यमातून पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आल्या.
कलाकारांचा सत्कार रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, विश्वस्त भारत वेदपाठक, संवाद पुणेचे सुनील महाजन, गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन आनंद देशमुख यांनी केले.
डॉ. प्रभा अत्रे यांचे विचार काळाशी सुसंगत : पंडित हरिप्रसाद चौरसिया
राग-रागिणी सादरीकरणावर काळाचे बंधन नको, या प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेविषयी मी सहमत आहे, असे सांगून पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे यांची संगीत क्षेत्रातील साधना मोठी असून त्यांनी याविषयीचा सखोल अभ्यास केला आहे.
राग सादरीकरण आणि समय यांचा एकमेकांशी संबंध नको, आजच्या काळात या संकल्पनेला महत्त्व नाही हा त्यांचा विचार सुसंगत आहे.पंडित योगेश समसी म्हणाले, कालबाह्य रागसंगीत या विषयी विचारमंथन होणे आवश्यक आहे. जोड रागाचे सादरीकरण, कर्नाटकी संगीत पाहता प्रभा अत्रे यांचे विचार सुसंगत वाटतात. संगीताची गुरुमुखी परंपरा जपण्यासाठी ही संकल्पना योग्य आहे.
पंडित राजा काळे म्हणाले, कालबाह्य राग सादरीकरणाची संकल्पना सादर करताना कलाकाराची मानसिकता महत्त्वाची असते. कलाकाराने रागामागील शास्त्र सादर न करता तो सिद्ध करून रसिकांसमोर आणणे आवश्यक आहे. रागाचे शास्त्र नव्हे तर धून प्रकट करणे हे कलाकाराचे मोठेपण आहे.