गोल्डन आय न्यूज नेटवर्क
लेखकालाही माणसाचे अंतरंग समजतात : लक्ष्मीकांत देशमुख !
‘बदल’ विषयावरील ‘मनोकल्प’ दिवाळी अंकाचे प्रकाशन .!
पुणे : बदल ही माणसाची प्रवृत्ती असते, पण बदल स्वीकारताना त्याविषयीचे विचार-अभ्यास हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. अंतर्बोध, आत्मबोध झाल्यास बदल स्वीकारणे सोपे जाते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
लेखक विचार करतो त्यालाही मानसशास्त्राची बैठक असते. लेखकाला माणसाचे अंतरंग समजतात म्हणूनच तो लिहिता होतो. ‘मनोकल्प’द्वारे सहजसोप्या भाषेत मानसशास्त्र वाचकांपर्यंत पोहोचत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
मनोकल्प’ दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) अभय देशपांडे, अपर्णा चव्हाण, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. संगीता बर्वे, सुजाता थोरात, प्रकाश थोरात.
मानसिक आरोग्यावरील ‘मनोकल्प’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज (दि. 22 ऑक्टोबर) फिरोदिया हॉल येथे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. संगीता बर्वे होत्या. अंकाच्या संपादिका अपर्णा चव्हाण, सुजाता थोरात, प्रकाश थोरात व्यासपीठावर होते.
यंदाचा दिवाळी अंक ‘बदल’ या विषयावर आहे. ‘मनोकल्प’च्या ऑडिओ आणि ई-बुक आवृत्तीचे प्रकाशनही या प्रसंगी झाले.
‘बदल’ या संकल्पनेविषयी बोलताना देशमुख म्हणाले, ज्या गोष्टी आपण करीत आहोत त्यातील रुची कमी झाली आहे का, बदल हवाहवासा वाटतो आहे का, बदल स्वीकारण्याची आपली पात्रता आहे का आणि त्याला उपयुक्त अशा साधनसामुग्रीची उपलब्धता आहे का याचा विचार करणे आवश्यक ठरते.
वाचकांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी उत्तम साहित्यकृतीही उपयुक्त ठरते, त्यामुळे वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, आजच्या सामाजिक परिस्थितीमुळे संपूर्ण जगालाच मानसिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रत्येकाला स्वत:मध्ये सातत्याने बदल घडवावेच लागतात.
बाहेरील गोंधळाला सामोरे जाताना मनातील शांतता जपावी लागते आणि ती जपल्यास बदलांना सामोरे जाणे सहजतेने घडते. मनातील कल्प-विकल्पांचा तोल सावरणे सोपे जाते.
प्रास्ताविकात अंकाच्या संपादिका अपर्णा चव्हाण यांनी अंकाच्या वाटचालीविषयीचा आढावा घेतला. उपस्थितांचे स्वागत प्रकाश थोरात, सुजाता थोरात, अभय थोरात यांनी केले. सूत्रसंचालन अभय देशपांडे यांनी केले तर आभार सुषमा थोरात यांनी मानले.
जाहिरात