गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे योग्य-अयोग्यतेचे होईल मार्गदर्शन !
‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्रांतिकारी भविष्य’ विषयावर डॉ. दीपक शिकारपूर यांचे व्याख्यान
पुणे : शिक्षणापासून ते उद्योग, व्यवसाय, अर्थ, संरक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जलद गतीने वाढत आहे. भविष्यात हा वेग अधिक वाढणार असून युवा पिढीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात स्वत:चे ज्ञान अद्ययावत ठेवल्यास भविष्य उज्ज्वल असणार आहे. भविष्य काळात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे फक्त माहितीचेच आदान प्रदान होणार नाही तर योग्य-अयोग्यतेचे मार्गदर्शनही करून दिले जाईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्रांतिकारी भविष्य’ या विषयावर बोलताना डॉ. दीपक शिकारपूर.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी झाल्या तरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगाराची नवी दालने खुली होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्रांतिकारी भविष्य’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात डॉ. दीपक शिकारपूर आणि एअर मार्शल भूषण गोखले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या पुणे संवाद या उपक्रमाअंतर्गत ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्रांतिकारी भविष्य’ या विषयावर आज (दि. 18) डॉ. शिकारपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
एमईएस सभागृहात व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमईएस आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरचे विश्वस्त एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या संस्थापक सदस्य स्वाती राजे, एमईएसचे डॉ. संतोष देशपांडे, डॉ. मानसी दाते व्यासपीठावर होते.
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायाची द्वारे खुली होणार असल्याचे सांगून डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, सोशल मीडिया, फेशिअल डिटेक्शन, माहिती संपादन, ई-पेमेंटस्, संशोधन, चॅटबॉटस्, डिजिटल असिस्टन्स अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. अर्थात या क्षेत्रातही अनेक आव्हाने आहेत. ज्यात मुख्यत्वेकरून माहितीची गुप्तता आणि सुरक्षा तसेच अधिक आर्थिक मूल्य याचा विचार करणे गरजेचे ठरणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रणालींविषयी डॉ.शिकारपूर यांनी उपस्थितांना अवगत केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचे तंत्रज्ञान स्थानिक भाषांमध्ये येण्यासाठी अद्याप बराच कालावधी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना भूषण गोखले म्हणाले, विद्यार्थ्यांनी करिअरच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचे महत्त्व वेळीच ओळखून स्वत:ला ज्ञानसंपन्न करावे. स्वाती राजे यांनी प्रास्ताविकात पुणे इंटनॅशनल सेंटरच्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. संतोष देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
जाहिरात