गोल्डन आय न्यूज नेटवर्क
राग प्रहरांच्या संकल्पनांपासून मुक्त
‘रागप्रभा संगीतोत्सवा’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे 2 मार्चला आयोजन !!L
डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेवर आधारित संगीतोत्सव : दिग्गज कलाकारांचा सहभाग
पुणे : राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‘रागप्रभा संगीतोत्सवा’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे रविवार, दि. 2 मार्च 2025 रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत सादरीकरणाला राग-समयाचे बंधन नको या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेवर आधारित गायन-वादनाचा हा पहिला संगीत महोत्सव आहे.
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील रागांचे समय प्रहरानुसार सादरीकरण करायचे झाल्यास ज्या प्रहरात सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत ते राग विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. तसेच मिश्र रागांचे सादरीकरण होणे शक्य नाही. यातून पर्यायाने भारतीय संगीत क्षेत्राचे आणि कलाकाराचे नुकसानच होईल.
अशा परिस्थितीत कोणत्याही रागाचे कोणत्याही वेळी उत्तम प्रस्तुतीकरण होऊन तो रोग त्याच्या पूर्ण सौंदर्यासह खुलविला जाऊ शकतो, अशी धारणा डॉ. प्रभा अत्रे यांची आहे. या संकल्पनेला अनुरसरून हा महोत्सव आयोजित केला असल्याचे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
संगीतोत्सव दि. 2 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 9:30 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या सत्राची सुरुवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने होणार आहे. त्यानंतर पंडित उदय भवाळकर, पंडिता पद्मा तळवलकर, पंडित राम देशपांडे, पंडित राजा काळे यांचे गायन होणार आहे.
दुसऱ्या सत्राची सुरुवात दुपारी 4 वाजता होणार असून सुरुवातीस ताकाहिरो अकाई यांचे संतूर वादन होणार आहे. त्यानंतर पंडित श्रीनिवास जोशी, पंडित विनायक तोरवी, पंडिता अलका देव-मारुलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन होणार आहे.
कलाकारांना पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, पंडित योगेश समसी, पंडित अरविंदकुमार आझाद, भरत कामत, ऋषिकेश जगताप, प्रशांत पांडव, अजिंक्य जोशी (तबला), चैतन्य कुंटे, सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकर्णी, अविनाश दिघे, राहुल गोळे (संवादिनी), मृणाल उपाध्याय, प्रताप आव्हाड (पखवाज) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.