गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सर, तुम्हाला कविता सुचते कशी?
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित कार्यक्रमात एकनाथ आव्हाड यांच्याशी शिबिरार्थींनी साधला संवाद !
नाट्य कार्यशाळेच्या समारोपानिमित्त ‘छंद देई आनंद’ नृत्य-नाट्य-काव्याविष्कार सादर .
पुणे : सर, तुम्हाला कविता सुचते कशी? आतापर्यंत किती कविता लिहिल्या? लिहिताना दम लागत नाही का? कविता लिहिताना चांगली वाटते, पण तीच कविता वाचताना आवडत नाही अशा वेळी ती फाडायची की ठेवायची? अशी प्रश्नांची सरबत्ती केली ती शिबिरार्थींनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त एकनाथ आव्हाड यांना!
निमित्त होते ते नाट्यसंस्कार अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या रविवार सत्र नाट्य कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे. ‘छंद देई आनंद’ या आव्हाड यांच्या काव्यसंग्रहावर आधारित ‘छंद देई आंनद’ हा नृत्य-नाट्य-काव्याविष्कार शिबिरार्थींनी सादर केला. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आव्हाड यांच्याशी मुक्तसंवाद साधला.
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सत्कार समारंभात (डावीकडून) संध्या कुलकर्णी, राजन लाखे, एकनाथ आव्हाड, प्रकाश पारखी, दिपाली निरगुडकर
साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरुवातीस आव्हाड यांचा सत्कार अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या हस्ते करण्यात आला. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त दिपाली कुलकर्णी, संध्या कुलकर्णी व्यासपीठावर होते.
सुदर्शन रंगमंच येथे आयोजित कार्यक्रमात रविवार सत्र नाट्य कार्यशाळेतील 45 बालकलकारांनी ‘छंद देई आनंद’ हा कार्यक्रम सादर केला. मुलांच्या विश्वातील प्राणी, पक्षी, परी, भुतोबा, शाबासकी, बैठ्या खेळांची गंमत या आणि इतर कवितांद्वारे सर्वधर्म समभाव आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व साभिनय सादर केला. संध्या कुलकर्णी, दीप्ती असवडेकर, अनुराधा कुलकर्णी, राधिका देशपांडे, अंजली दफ्तरदार यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू सांभाळली तर पार्थ कोकीळ याने संगीताची साथ केली.
मुलांसाठी लिहिलेल्या कविता मुलांच्या साभिनय सादरीकरणातून इतर मुलांपर्यंत पोहोचत आहेत हे बघून मनस्वी आनंद झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एकनाथ आव्हाड म्हणाले, लिखाण वा कोणतीही गोष्ट करताना ती पूर्णपणे लक्ष केंद्रीत करून केली पाहिजे. आपल्या निरीक्षण शक्तीतून लिखाणासाठी विषय सुचत जातात. त्यावर मनन, चिंतन करावे.
स्वत: लिहिलेली कविता आपल्याच नाही आवडली तर विचार करून पुन्हा लिहिवी.राजन लाखे म्हणाले, कविता लिहाण्यासाठी वेळ, काळ असे काही ठरलेले नसते. आपल्या अवती-भोवती जे लहान-लहान प्रसंग घडतात त्यावर कविता करता येवू शकते. मात्र कवितेत आशय आणि ओळींना अर्थ असावा लागतो.
सुरुवासीत नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या उपक्रामांची माहिती प्रास्ताविकात सांगितली. प्रमुख अतिथींचा परिचय प्रसन्न सोहनी यांनी करून दिला तर दिपाली निरगुडकर यांनी आभार मानले.
————————————————————————–जाहिरात