गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मराठी रंगभूमी पुणेच्या अमृतमहोत्सवानिमित्त संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन!!
‘सुवर्णतुला’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’ सादर होणार नव्या संचात
उल्हास पवार उद्घाटक तर शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ!
पुणे : गंधर्वभूषण जयराम शिलेदार आणि जयमालाबाई शिलेदार यांनी मुहूर्तमेढ रोवलेली मराठी रंगभूमी, पुणे ही संस्था अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सलग 74 वर्षे संगीत रंगभूमीची सेवा करणाऱ्या या संस्थेतर्फे तीन दिवसीय संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रसिकांना तीन दर्जेदार नाट्यकृती बघता येणार आहेत,
अशी माहिती संस्थेच्या प्रमुख, नाट्यनिर्मात्या दिप्ती भोगले यांनी निवेदनाद्वारे दिली. संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गुणगौरव सोहळाही आयोजित करण्यात आला आहे.संगीत नाट्यमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर विद्याधर गोखले लिखित संगीत सुवर्णतुला या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
रविवार, दि. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र हे नाटक सादर होणार आहे. संगीत नाट्यमहोत्सवाचा सांगता समारंभ सोमवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. संगीत रंगभूमीची दीर्घकाळ सेवा करणारे संजय देशपांडे आणि युवा कलावंत रोहन भडसावळे यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. त्यानंतर गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ नाटकाचा प्रयोग होणार आहे.
संपूर्ण जग संक्रमणावस्थेतून जात असताना, नावाजलेल्या नाट्यसंस्था बंद पडत असताना दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून केवळ संगीत नाटकेच सादर करायची या निश्चयाने गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांनी दि. 1 ऑक्टोबर 1949 रोजी मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीस ही संस्था बिऱ्हाडी स्वरूपाची होती. सगळे कलावंत आपापल्या कुटुंबासह कंपनीत राहत असत. जुन्या नाटकांबरोबरच दर दोन-तीन महिन्यांनी नवीन नाटक सादर केले जाई. 1984 साली संस्थेला विष्णुदास भावे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले आहे.
नाट्यमहोत्सव सशुल्क असून केवळ सातशे रुपयांमध्ये तीनही नाट्यप्रयोग बघता येणार आहेत. दि. 24 सप्टेंबरपासून तिकीटविक्रीला सुरुवात होत आहे. महोत्सवातील नाट्यप्रयोग रसिकांसाठी नक्कीच पर्वणी ठरतील, असा विश्वास दिप्ती भोगले यांनी व्यक्त केला.
———————————————————————–
जाहिरात