गोल्डन आय न्युज नेटवर्क
बंदिशींद्वारे गुरुचरणी अर्पण केली गानपुष्पांजली!!
पंडित राजेंद्र कंदलगांवकर यांना शिष्यांतर्फे ‘गुरू वंदना’!!
पुणे : पुरियाधनाश्री, मालकंस, भूप, वृंदावनी सारंग, जौनपुरी, बागेश्री, यमन, खमाज या रागातील बंदिशींद्वारे गानपुष्पांजली गुरुचरणी अर्पण केली. विशेष म्हणजे गुरुंकडून मिळालेले सांगीतिक मार्गदर्शन स्वत:च्या विचारांनी ख्याल गायकीतून सादर केले.
निमित्त होते किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित राजेंद्र कंदलगांवकर यांच्या शिष्यांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरू वंदना’ कार्यक्रमाचे.
सवाई गंधर्व स्मारक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गुरुंकडून मिळालेले सांगीतिक विचार शिष्यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांसमोर प्रस्तुत केले. पंडित कंदलगांवकर यांच्या शिष्यांच्या उपस्थितीत गुरुपूजन करण्यात आले.सुरुवातीस पंडित कंदलगावकर आणि शुभांगी कंदलगांवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व वयोगटातील शिष्यांना सादरीकरणाची संधी मिळाली.
गुरुपूजन करताना पंडित राजेंद्र कंदलगांवकर यांचे शिष्य.
अमोघ, अभिरूप, ज्ञानेश्वरी, केदार, श्रेयस, वीरा, गौरांग, रागांगी, वृषाली, मिहिर, रणजित, अनिरुद्ध, सूरज, साधना, ऋचा, कल्याणी, स्पर्श, निखिल, अथर्व, नकुल, अभिषेक, चारुहास, प्रथमेश, अंबरिष या शिष्यांचे सादरीकरण झाले. चोखेश्वर नाकाडे (तबला), रवी फडके, कल्याणी शेटे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. प्रथम सत्राचे निवेदन अभिषेक भारद्वाज यांनी केले.
पंडित कंदलगांवकर यांचे शिष्य गुलाबराव बुधे यांनी पंडितजींना अर्पण करण्यासाठी रचलेली आणि स्वरबद्ध केलेली तर पंडित रघुनंदन पणशीकर यांनी गायलेली गुरू वंदना ऐकविण्यात आली. या निमित्ताने बुधे आणि पंडित पणशीकर यांचा सत्कार पं. कंदलगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर आणि प्रसिद्ध तबलावादक नचिकेत मेहेंदळे यांची विशेष उपस्थिती होती.
गुरू पूजन मैफलीत पंडित राजेंद्र कंदलगांवर यांचे गायन झाले. त्यांच्या समवेत साथसंगत करताना गणेश तानवडे (तबला), हर्षद डोंगरे (तानपुरा, सहगायन), रवी फडके (सहगायन), उमेश पुरोहित (हार्मोनियम).
गायनात सुरेलपणा आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा पंडित कंदलगांवकर वारसा जपत आहे, असे गौरवोद्गार घोटकर यांनी काढले. दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन संयुक्ता कंदलगांवकर यांनी केले. सभागृहाच्या आवारात माधुरी डोंगरे यांनी पंडित कंदलगांवर यांची आकर्षक रांगोळी रेखाटली होती.
गुरुपूजन सोहळ्यानंतर आदित्य देवधर, सिद्धेश दसवडकर, अश्विन कुलकर्णी, सुमेध घमंडे तसेच पंडित कंदलगांवकर यांचे ज्येष्ठ शिष्य हर्षद डोंगरे आणि रवी फडके यांचे गायन झाले. सोहळ्याचा समारोप पंडित राजेंद्र कंदलगांवर यांच्या मैफलीने झाला. त्यांनी दरबारी कानडा रागातील ‘घुंघटके पट खोल’ आणि ‘अनोखा लाडला’ या रचना सादर केल्या.
मैफलीचा समारोप भैरवीतील ‘बाजू बंद खुल खुल जा’ या रचनेने केला. गणेश तानवडे (तबला), उमेश पुरोहित (हार्मोनियम), हर्षद डोंगरे (तानपुरा, सहगायन), रवी फडके (सहगायन) यांनी साथ केली.
जाहिरात