गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गीत रामायणाच्या अखंड स्वरयज्ञात रसिकांना भक्तिरसाची अनुभूती महक कॉन्सर्टस् ॲण्ड इव्हेंटस्तर्फे आयोजन :
मनिषा निश्चल, आनंद माडगूळकर, श्रेया माडगूळकर-सरपोतदार, मनोज कान्हेगांवर यांचे सादरीकरण!!
पुणे : आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर रचित आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीत रामायणाच्या स्वरयज्ञाची पुणेकर रसिकांनी आज संपूर्ण दिवस दिव्यानुभूती घेतली. महक कॉन्सर्टस् ॲण्ड इव्हेंटस् आयोजित कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. गीत रामायणातील सर्व 56 गीते कथानकासह सादर करण्यात आली. संपूर्ण गीत रामायण एका दिवसात सादर करण्याची किमयाही सांस्कृतिक नगरीत पहिल्यांदाच घडली.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रस्तुती महक कॉन्सर्टस् ॲण्ड इव्हेंटस्च्या संचालिका मनिषा निश्चल यांची होती. कार्यक्रमाला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली तर समारोप रात्री आठ वाजता झाला. रामचरितमानस या गौरव ग्रंथाचे रचियते गोस्वामी तुलसीदास जयंती आणि श्रावणमास पुण्य पर्वानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार श्रीनिवास पाटील, संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार, सतिश देसाई, आपले घरचे विजय फळणीकर, मनिषा निश्चल, आनंद माडगूळकर, डॉ. संदीप बुटाला, व्ही. एस. अंकलकोटे पाटील, अजित जगताप, सुजाता जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.
गीत रामायणाची सुरुवात आनंद माडगूळकर यांनी गायलेल्या ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती’ या गीताने झाली. ‘शरयू तिरावरी अयोध्या’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला ग सखे’, ‘सावळा गं रामचंद्र’, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला’, ‘जोड झणी कामुर्का’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘रामाविण राज्यपदी कोण बैसतो’, ‘जेथे राघव तेथे सीता’, ‘नकोस नौके..’, ‘माता न तू वैरिणी’, ‘पराधीन आहे..’, ‘सूड घे त्याचा लंकापती’, ‘याचका थांबू नको दारात’, ‘धन्य मी शबरी’, ‘असा हा एकच श्री हनुमान’, ‘सेतू बांधा रे सागरी’, ‘भूवरी रावण वध झाला’, ‘त्रिवार जयजयकार रामा’, ‘डोहाळे पुरवा रघुकुलतिलका’ यासह इतर गीते सादर करण्यात आली. ‘गा बाळांनो श्रीरामयाण’ या गीताने स्वरयज्ञाची सांगता झाली.
या अनोख्या सोहळ्यासाठी पुण्याच्या विविध भागातून रसिकांनी हजेरी लावत सादरीकरणाला भरभरून दाद देऊन भक्तिरसाची अनुभूती घेतली. गीत रामायणाच्या सादरीकरणाची सुरुवात होऊन 68 वर्षे झाली तरी त्याची अवीट गोडी अजूनही टिकून असल्याचे या निमित्ताने जाणवले.
गदिमा यांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांनी त्यांच्या प्रासादिक वाणीत रामायणकथा विशद करीत गीते सादर केली. मनिषा निश्चल, आनंद माडगूळकर यांच्या कन्या श्रेया माडगूळकर-सरपोतदार, मनोज कान्हेगांवर, वंडरबॉय पृथ्वीराज यांनी गीते सादर केली. केदार परांजपे यांनी वाद्यवृंद संयोजन केले तर प्रमोद रानडे, अमृता ठाकूरदेसाई, प्रणव कुलकर्णी, विशाल गंड्रतवार, अपूर्व द्रविड, आदित्य आपटे यांनी प्रभावी साथसंगत केली.
महक कॉन्सर्टस् ॲण्ड इव्हेंटस् आयोजित कार्यक्रमात गीत रामायणातील गीते सादर करताना श्रेया माडगूळकर-सरपोतदार, मनिषा निश्चल, आनंद माडगूळकर, मनोज कान्हेगांवर, प्रमोद रानडे
खासदार श्रीनिवास पाटील, उल्हास पवार यांनी या वेळी बोलताना माडगूळकर कुटुंबियांसमवेतच्या आठवणींना उजाळा दिला. अजित जगताप यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा सत्कार निश्चल लताड आणि मनिषा निश्चल यांनी केला. कलाकारांचा सत्कार श्रीनिवास पाटील आणि उल्हास पवार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा
उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करताना सुजाता जगताप म्हणाल्या, गोस्वामी तुलसीदास जयंती, श्रावणमास पुण्यपर्वानिमत्ति गीत रामायणाचे आयोजन हा मंगलयोग आज जुळून आला आहे. आजच्या दिवशी चांद्रयान-3 मोहिमेसाठी विशेष दिवस असून आजच्या दिवशीच चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरणार आहे. या कार्यक्रमाद्वारे निर्माण झालेल्या लहरी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करण्यास सदिच्छा रूपाने उपयुक्त ठरतील.
जाहिरात