गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संत चोखामेळा साहित्य संमेलन!!
सयोजन समितीच्या अध्यक्षपदी हभप माणिकबुवा मोरेमहाराज यांची निवड.
पुणे : संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले संत चोखामेळा साहित्य संमेलन दि. 18 व 19 नोव्हेंबर 2023 रोजी आळंदी येथे होत आहे. या साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी देहू येथील जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह. भ. प. माणिकबुवा मोरेमहाराज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
हभप माणिकबुवा मोरे महाराज
संमेलनाच्या अनुषंगाने संबंधित सहयोगी संस्थांची बैठक आळंदी येथे आयोजित करण्यात आली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ओम दत्तोपासक, संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा उल्का धावारे-चंदनशिवे, संमेलनाध्यक्ष आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक-संशोधक प्रा. डॉ. आप्पासाहेब पुजारी, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख माणिकराव सोनवणे, प्रा विनोद सूर्यवंशी, प्रा अल्का सपकाळ, आशिष यादव, कल्याणराव पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज यांची संयोजन समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
माणिकबुवा मोरेमहाराज हे देहू ते पंढरपूर या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत. देहू संस्थानचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. राज्यातील शिवप्रेमी चळवळीत, देशी गोपालन आणि वारकरी संप्रदायाच्या उत्कर्ष अन् संवर्धन कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
मोरेमहाराज यांची संयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या कार्याचा संमेलनाच्या आयोजनात लाभ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. संमेलनाच्या बोधचिन्हांचे अलीकडेच ह. भ. प. बाबामहाराज सातारकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे.
जाहिरात