गोल्डन आय न्युज नेटवर्क
वर्षागीतांच्या सुरेल सरींमध्ये रसिक चिंब!!
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित राग मल्हारमधील चित्रपट गीतांची पर्वणी!!
पुणे : ‘एक लडकी भिगी भागीसी’, ‘जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात’, ‘मेघा छाए आधी रात’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘श्रावणात घन निळा’, ‘ये रे घना ये रे घना’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ अशा अनेक सदाबहार हिंदी-मराठी पाऊस गीतांनी रसिकांना चिंब केले. निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘रंग मल्हार .. गीत वर्षा .. गाणी पावसाची’ या अनोख्या श्रावण मैफलीचे.
पूना गेस्ट हाऊस येथे आज (दि. 21) सायंकाळी ही मैफल रंगली. तीन तासांहून अधिक रंगलेल्या मैफलीत राग मल्हारमधील चित्रपट गीतांचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, प्रभात बँडचे श्रीपाद सोलापूरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, एकपात्री कलावंत संतोष चोरडिया यांच्यासह पुणेकर आणि पुण्याबाहेरील अनेक रसिक आवर्जून उपस्थित होते.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित मैफलीत सहभागी प्राजक्ता सावरकर-शिंदे, सावनी सावरकर, धनंजय पवार, प्रणव तडवळकर, तेजस्विनी नाईक.
हिंदीमराठी चित्रपटसृष्टीतील पाऊसगीते रोमांचित वातावरण निर्मिती करतात याचाच प्रत्यय आजच्या मैफिलीत रसिकांना आला. कार्यक्रमाची सुरुवात ‘उमड घुमड गरज गरज’ या गौड मल्हार रागातील गीताने झाली. त्यानंतर यमन रागातील ‘जा रे बदरा’, किरवाणी-पिलू रागावर आधारित ‘रिमझिम गीरे सावन’, राग पहाडीतील ‘सावन के झुले पडे’ तर चारुकेशी रागातील ‘ऋतु हिरवा ऋतु बरावा’, सूर मल्हार रागातील ‘गर लागे गरजे बदरिया’ अशी एकाहून सुरेल पाऊसगीते सादर करण्यात आली.
‘मेघा रे मेघा रे’, ‘रिमझिम रिमझिम’, ‘दिवाना हुआ बादल’, ‘झिल मिल सितारोंका’ अशी युगल गीतेही सादर करण्यात आली.
निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या आठवणींना उजाळा देत गायकांनी ‘चिंब पावसाने रान झालं’, ‘घन ओथंबून येती’, ‘नभ उतरू आलं’ या गीतांची झलक सादर केली.
शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीते तसेच लावणी या सर्व गीत प्रकारांमधून बरसलेला पाऊस रसिकांना उल्हासित करणारा ठरला. कलाकारांच्या सुरात सूर मिसळत, उत्स्फूर्त दाद देत रसिकांनी श्रावणसरींचा आनंद घेतला.
प्राजक्ता सावरकर-शिंदे, सावनी सावरकर, तेजस्विनी नाईक, प्रणव तडवळकर आणि धनंजय पवार यांनी सुरेल आवाजात गीते सादर केली. तर अरविंद काडगांवकर (तबला), प्रसन्न बाम (संवादिनी), वासुदेव बापट (ढोलक-तालवाद्य), अद्वैत कुलकर्णी (सिंथ) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता नादमुद्रा ग्रुपचे उदय नानिवडेकर यांची होती. निवेदन रेखा दैठणकर यांनी केले.
सुरुवातीस दीपा देशपांडे यांनी पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे उपस्थितांचे स्वागत केले. कलाकारांचा सत्कार रमाकांत परांजपे यांच्या हस्ते करण्यात आला. पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी मनोगतात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. नागपंचमीनिमित्त शर्मिला खांडके आणि संगीता रेडे यांनी उपस्थित महिलांच्या हातावर मेहेंदी रेखाटली. ———————————————————————-
जाहिरात