गोल्डन आय न्यूज नेटवर्क
उपयुक्त मनुष्यबळ निर्मिती शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हान : प्रा. मिलिंद जोशी. सकारात्मकतेतून कळतेजीवनाचे तत्त्वज्ञान : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी.
डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘स्मार्ट टेक करिअर्स’ पुस्तकाचे प्रकाशन!!
पुणे : उपलब्ध मनुष्यबळाचे उपयुक्त मनुष्यबळामध्ये रुपांतर करणे हे आज शिक्षण क्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. यशाला शॉर्टकट नाही त्यामुळे सर्जनशिलता, कल्पकता आणि नाविन्याची जोड देत स्वत:ला सिद्ध करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘स्मार्ट टेक करिअर्स’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 19) प्रा. जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, बेलराईज इंडस्ट्रीज् च्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विद्यार्थी विकास केंद्राच्या अध्यक्षा सुप्रिया केळवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
स्मार्ट टेक करिअर्स’ पुस्तक प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) सुप्रिया बडवे, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. दीपक शिकारपूर, नितीन गोगटे आणि तुषार रंजनकर.
नितीन प्रकाशन प्रकाशित डॉ. शिकारपूर यांचे हे 51वे पुस्तक आहे. विद्यार्थी साहाय्यक समितीच्या अच्युतराव आपटे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाशक नितीन गागेटे तसेच विद्यार्थी सहाय्यक समितीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना संवादही महत्त्वाचा आहे, असे सांगून कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, अभ्यासक्रम स्मार्ट नसतो तर व्यवस्था स्मार्ट असते. एखाद्या प्रश्नाकडे सकारात्मकपणे बघताना जीवनाचे तत्त्वज्ञान कळते. पुस्तकाविषयी बोलताना कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, मराठी भाषेत लिहिले गेलेले हे पुस्तक सामान्य विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.
वेळ हेच भांडवल असल्याने टाईमपास या युवा पिढीच्या शत्रूचा नाश करून वेळ सत्कारणी लावत नियोजन करणे आवश्यक आहे, असे डॉ. दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. संभाषण कौशल्य आणि बहुभाषिकता या मुद्द्याकडे त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेध केले.
जागतिकीकरणाच्या रेट्यात स्वयंशिस्त, वेळेचे नियोजन, समूह व्यवस्थान आणि उत्तम आकलन या चतु:सूत्रीचा अवलंब केल्यास यश नक्की मिळेल असे सुप्रिया बडवे म्हणाल्या. उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्याने सर्व स्तरात कौशल्य विकासावर भर दिला जात आहे.
सुरुवातीस तुषार रंजनकर यांनी विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया केळवकर यांनी केले. आभार अंगारिकी मांडे हिने मानले.
जाहिरात