गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुह्रदांच्या उपस्थितीत रंगला ‘मॉम इंडिया’चा सुवर्ण महोत्सवी सोहळा!!
सचिन पिळगांवकर, सुदेश भोसले यांच्या तालावर थिरकले पुणेकर रसिक.!
पुणे : सुमधुर आणि श्रवणीय गीतांचे सादरीकरण, प्रसिद्ध अभिनेते, पार्श्वगायक सचिन पिळगांवकर, प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भासले यांची सांगीतिक हजेरी ‘गोल्डन ज्युबिली’ अल्बमचे प्रकाशन, जीवनगौरव पुरस्कार वितरण असा हृद्य सोहळा सुह्रदांच्या उपस्थितीत रंगला. निमित्त होते ते ‘मॉम इंडिया’ दि एन्टरटेनर्स म्युझिक ग्रुपच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अनोख्या कार्यक्रमाचे!
वाद्यवृंद क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून पाच दशकांची वाटचाल पूर्ण केलेल्या ‘मॉम इंडिया’ दि एन्टरटेनर्स म्युझिक ग्रुपचा सुवर्ण महोत्सवी सोहळा मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिरिंगच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलाने झाली. ‘मॉम इंडिया’चे संस्थापक-संचालक मोहनकुमार भंडारी, उज्ज्वला भंडारी, सचिन पिळगांवकर, सुदेश भोसले, प्रविण चोरबेले, अशोककुमार सराफ, इकबाल दरबार, ऐश्वर्या भंडारी, सुश्मिता भंडारी यांची उपस्थिती होती.
मॉम इंडिया’ दि एन्टरटेनर्स म्युझिक ग्रुप आयोजित कार्यक्रमात अशोककुमार सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना सचिन पिळगांवकर, सुदेश भोसले, मोहनकुमार भंडारी, उज्ज्वला भंडारी, प्रविण सराफ आदी.
मान्यवरांचे स्वागत चंद्रकांत भंडारी व डॉ. रमेश भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. मोहनकुमार भंडारी यांच्या सांगीतिक प्रवासाची वाटचाल दाखविणाऱ्या ‘मॉम इंडियाज् सुहाना सफर ग्लोरिअस 50 इयर्स’ यालघुपटाचे प्रसारण या वेळी करण्यातआले.
सचिन पिळगांवकर आणि सुदेश भोसले यांनी रसिकांच्या आग्रहाखातर सादर केलेल्या विविध गीतांवर रसिकांनी ताल धरला. ‘इक दिन बिक जाएगा..’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘जिंदगी के सफर में’, ‘दर्दे दिल दर्दे जिगर’, ‘चला जाता हूँ’, ‘निगाहे मिलाने को’, ‘ये शाम मस्तानी’ या एकाहून लोकप्रिय गीतांसह ‘गोल्डन ज्युबिली’ या अल्बममधील गीतेही सादर करण्यात आली.
गीत सादर करताना सचिन पिळगांवकर, सुदेश भोसले.
मोहनकुमार भंडारी यांच्यासह ऐश्वर्या, सुश्मिता भंडारी आणि भाग्यश्री भंडारे तसेच प्रशांत चेंडके, गोपाल भाटिया (न्यूझिलंड), हिम्मतकुमार, श्रेयस पुराणिक यांनी गीते सादर केली. वाद्यवृंदाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर गारूड केलेल्या ‘मॉम इंडिया’ दि एन्टरटेनर्स म्युझिक ग्रुपच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला रसिकांनी हजेरी लावून प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
हा कार्यक्रम लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे जगातील रसिकांनी एकाचवेळी पाहिला हे सुद्धा या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य.
मोहनकुमार यांच्या स्वरचित ‘गोल्डन ज्युबिली’ या अल्बमचे प्रकाशन सचिन पिळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. अल्बममधील गीतांना मोहनकुमार यांनीच संगीत दिलेले असून अल्बममधील गीते प्रसिद्ध गायक सोनू निगम, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, प्रतिभासिंग बाघेल, ऐश्वर्या, सुश्मिता आणि भाग्यश्री भंडारे यांनी गायलेली आहेत.
मॉम इंडिया’ दि एन्टरटेनर्स म्युझिक ग्रुप आयोजित कार्यक्रमात गीत सादर करताना मोहनकुमार भंडारी.
मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोककुमार सराफ यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला तर संगीत व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शुभम-सौरभ वाखारे, सॉवेरी वर्मा, जितेंद्र कुलकर्णी, गौतम बाफना, मुकेश देढीया, विवेक परांजपे, पवन लढ्ढा, महेंद्र गणपुले, गोपाळ भाटिया, प्रमोद लाळे, प्रशांत चेंडके यांचा मॉम इंडिया गोल्डन अवॉर्ड देऊन सचिन पिळगांवकर आणि सुदेश भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रमोद लाळे यांच्या वतीने प्रभाकर वैद्य तर जितेंद्र कुलकर्णी यांच्या वतीने निलिमा कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला.
‘मॉम इंडिया’ दि एन्टरटेनर्स म्युझिक ग्रुपमुळे चित्रपट क्षेत्राला अनेक संगीताच्या प्रांतात अनेक कलाकार मिळाल्याचे गौरवोद्गार सचिन यांनी या वेळी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले.
_———————————————————————–
जाहिरात