गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘संगीत अतृप्ता’तून निषेधाचा बुलंद सूर : डॉ. श्रीपाल सबनीस.
पुरुषी वर्चस्वाच्या नादात स्त्रियांचे आजही होत आहे शोषण : डॉ. श्रीपाल सबनीस.
सुहास वाळुंजकर लिखित ‘संगीत अतृप्ता’ आणि ‘सौदा आणि इतर चार एकांकिका’ साहित्यकृतींचे प्रकाशन!!
पुणे : स्त्री-पुरुष समानता असे जरी आज म्हणत असलो तरी प्राचीन काळातील संस्कृतीमुळे पुरुषी वर्चस्वाच्या नादात स्त्रियांचे होत असलेले शोषण आजही सुरु आहे. पुरुषी व्यवस्थेचे विश्लेषण करीत स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील अत्यंत संयमित भाषेत कैवार घेत बुलंद असा निषेधाचा सूर नाटकाच्या माध्यमातून मांडता येतो हे ‘संगीत अतृप्ता’ या नाटकातून सिद्ध होत असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले.
महाभारतातील कथेच्या अंतरंगाला भिडण्याचे सामर्थ्य लेखकाने पुरोगामी समीक्षकाच्या भूमिकेतून मांडले आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.लेखन, दिग्दर्शन, गायन, अभिनय या क्षेत्रात अनुभवसिद्ध असलेल्या सुहास वाळुंजकर लिखित ‘संगीत अतृप्ता’ तसेच ‘सौदा आणि इतर चार एकांकिका’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज (दि. 20) डॉ. सबनीस आणि उच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती मृदुल भाटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. सबनीस अध्यक्षपदावरून बोलत होते.
संगीत अतृप्ता’ आणि ‘सौदा आणि इतर चार एकांकिका’ या पुस्तकांचे प्रकाशन करताना (डावीकडून) डॉ. संजय मेस्त्री, सुहास वाळुंजकर, मृदुल भाटकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. तुकाराम रोंगटे, अनिल पवळ.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, राजापूर येथील आबासाहे मराठे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मेस्त्री, गोंदण प्रकाशनचे अनिल पवळ व्यासपीठावर होते. वर्किंग वुमन होस्टेल हॉल, गोखले नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सबनीस पुढे म्हणाले, पुरुषी अहंकाराने भरलेल्या पक्षपाती, धर्म-राजसत्तेत स्त्रियांनी कुठे न्याय मागावा हा प्रश्न आजही समाजात दिसत आहे. मानवाने नियतीचा सोईस्कर वापर-भांडवल करून स्त्रियांशी खेळ केला आहे. स्त्री-पुरुष संबंध कालही ज्वलंत होता आजही ज्वलंत असल्याचे जाणवत आहे. ऋषीला चारित्र्य असते का हा क्रांतिकारी प्रश्न लेखकाने नाटकाद्वारे विचारला असल्याचे डॉ. सबनीस म्हणाले.
मृदुल भाटकर यांनी रमेश भाटकर कुटुंबिय आणि वाळुंजकर कुटुंबियांतील स्नेहभाव या वेळी बोलताना उलगडून सांगितला. वाळुंजकर यांच्यामुळे रमेश भाटकर कलाकार म्हणून रंगमंचावर आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.कवी कालिदास यांच्यापासून आजच्या सामाजिक प्रश्नांवर लेखकाने त्यांच्या साहित्यकृतीतून भाष्य केले असल्याचे डॉ. तुकाराम रोंगटे म्हणाले.
डॉ. संजय मेस्त्री म्हणाले, मानवतेची-करुणेची जाणीव वाळुंजकर यांच्या साहित्यकृतीतून आज पुढे आली आहे. परंपरा आणि नवतेला कवेत घेणाऱ्या या साहित्यकृती आहेत. लोकसंचिताला कवेत घेताना आजच्या समाजातील प्रश्नही लेखकाने आपल्या साहित्यातून समाजापुढे मांडले आहेत.लेखन आणि नाट्यप्रवासाविषयीची माहिती सुहास वाळुंजकर यांनी प्रास्ताविकात दिली. या साहित्यकृती विनयकुमार देशपांडे आणि रमेश भाटकर यांना समर्पित केल्याचे त्यांनी आवजूर्न सांगितले.
‘संगीत अतृप्ता’ या नाटकातील काही प्रसंगांचे अभिवाचन वंदना गरगटे, नेत्रा भालेराव, डॉ. विश्वास सहस्त्रबुद्धे, जयंत दाते, डॉ. वृषाली पटवर्धन यांनी केले. त्यांना मधुमिता देवधर-रसाळ (गायन), कुमार करंदीकर (संवादिनी-गायन), शुभम जोशी (तबला) यांनी साथ केली.मान्यवरांचे स्वागत सुहास वाळुंजकर, अपर्णा वाळुंजकर, अंकुर वाळुंजकर, स्वप्निल वाळुंजकर यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. वृषाली पटवर्धन यांनी केले.
जाहिरात