गोल्डन आय न्यूज नेटवर्क
हसबनीस दाम्पत्याच्या सादरीकरणाला रसिकांची दाद !
महाविद्यालयच्या ‘श्री व सौ’ आणि ‘सप्रेम’ उपक्रमात सादरीकरण !!
पुणे : संजीवनी हसबनीस यांच्या तबला तर श्रीराम हसबनीस यांच्या एकल संवादिनी वादनाने रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली.
तबला वादन करताना संजीवनी हसबनीस. संवादिनी साथ अमेय बिच्चू.
निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘श्री व सौ’ आणि ‘सप्रेम’ या अभिनव उपक्रमाचे.
गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित केलेल्या दोन दिवसीय सांगीतिक मैफलीची आज (दि. 4) सांगता झाली. रोहिणी व श्रीकांत कुबेर (पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांगीतिक मैफलीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्राची सुरुवात संजीवनी हसबनीस यांच्या एकल तबलावादाने झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात तीन तालातील कायदे, रेले तसेच पारंपरिक बंदिशीमधील गत-तुकडे सादर करून केली. यातील काही रचना पंडित जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्याकडून संजीवनी यांचे गुरू पंडित भाई गायतोंडे यांच्या परंपरेतून आलेल्या आहेत. अमेय बिच्चू यांनी संवादिनीवर सुरेल साथ केली.
संवादिनी वादन करतान श्रीराम हसबनीस. तबलाथास प्रशांत पांडव.
उत्तरार्धात श्रीराम हसबनीस यांचे एकल संवादिनी वादन झाले. त्यांनी राग गौडमल्हार सादर करून मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर बसंत-बहार (जोडराग) सादर करून रसिकांची दाद मिळवली. श्रीराम यांनी दाखविलेली जयजयवंती रागाची झलकही रसिकांच्या पसंतीस उतरली.
आपले गुरू पंडित तुळशीदास बोरकर यांच्या आठवणी जागवत त्यांनी मैफलीची सांगता ‘बोला अमृत बोला’ हे नाट्यपद सादर करून रसिकांना एक वेगळी अनुभूती दिली. त्यांना प्रशांत पांडव यांनी समर्पक तबलासाथ केली.
पंडित प्रमोद मराठे नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून वाद्य-वादक आणि श्रोतेही समृद्ध होतील, अशा प्रकारच्या कार्यक्रमांची मांडणी करतात. ‘सप्रेम’ हा त्याच संकल्पनेतून साकार झालेला उपक्रम आहे, अशा शब्दात श्रीराम हसबनीस यांनी पंडित मराठे यांच्या कार्याचा गौरव केला.
सुरुवातीस प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी ‘श्री व सौ’ आणि ‘सप्रेम’ या उपक्रमांची माहिती दिली. कलाकारांचा सत्कार रोहिणी व श्रीकांत कुबेर यांनी केला. तर कुबेर दाम्पत्याचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र आपटे आणि सहचिटणीस परिणिता मराठे यांनी केला.
गांधर्व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या कुबेर यांनी ‘श्री व सौ’ आणि ‘सप्रेम’ या अभिनव उपक्रमांच्या आयोजनाबद्दल पंडित मराठे यांचे अभिनंदन केले.
——————————————जाहिरात