गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्री व सौ’ आणि ‘सप्रेम’ची सुरेल सुरुवात
सव्वादिनीचे सुमधूर सूर आणि बहारदार गायनाची रसिकांना पर्वणी!!
पुणे : ‘श्री व सौ’ आणि ‘सप्रेम’ या अभिवन सांगीतिक उपक्रमाअंतर्गत आज (दि. 3) एकल संवादिनी वादन आणि गायनाच्या मैफलीचा रसिकांनी आनंद घेतला.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमातील पहिल्या कार्यक्रमात प्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर आणि प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर-कुंडलकर यांचा सहभाग होता. संजय व वर्षा चितळे (चितळे बंधू मिठाईवाले) यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘सप्रेम’ अर्थात संवादिनी प्रेमी मंडळ या अंतर्गत सुगोग कुंडलकर यांनी आपल्या वादनाची सुरुवात राग पुरिया धनाश्रीमधील विलंबित तिलवाडा व ‘पायलिया झनका’ आणि त्यानंतर आडा चौतालमधील एक पारंपरिक बंदिश सादर केली. यमनी बिहागचे सूर ऐकवून कुंडलकर यांनी टप्पा, खमाज आणि जयजयवंती यांचा संयोग करून एक स्वरचित धून सादर करून रसिकांसह अभ्यासकांनाही सुरेल भेट देत मैफलीची सांगता केली. त्यांना प्रसिद्ध तबलावादक भरत कामत यांनी समर्पक साथ केली
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘श्री व सौ’ या उपक्रमाअंतर्गत आरती ठाकूर-कुंडलकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात राग रागेश्रीमधील विलंबित एकतालात ‘गीनत रही तारे’ या बंदिशीने केली. यानंतर द्रुत तीनतालात ‘पिया घर ना आए मोरे’ ही बंदिश सादर केली. या दोनही बंदिशी आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गुरू स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांनी रचलेल्या आहेत.
झपतालातील ‘गरजे घटा’ या पारंपरिक बंदिशीनंतर सुयोग कुंडलकर यांनी रचलेली एक तालातील ‘गरज गरज बरसत आज सवन की बुंदरिया’ ही बंदिश सादर केली.
गायन मैफलीत संजय देशपांडे (तबला), आरती ठाकूर-कुंडलकर (गायन), सुयोग कुंडलकर
मैफलीची सांगता अशोक परांजपे लिखित ‘रंजल्या गांजल्या आपुला म्हणे जनार्दन भुकेलेल्या घास देतो माझा नारायण’ या भजनाने केली. या भजनाला राग परमेश्वरीमध्ये स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांनी स्वरसाज चढविलेला आहे. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), संजय देशपांडे (तबला) यांनी सुरेल साथ केली.
संवादिनी वादन करतान सुयोग कुंडलकर. तबलाथास भरत कामत
ज्या वाद्याने आपले आयुष्य घडविले त्या वाद्यासाठी काही करावे म्हणून मी व माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून ‘सप्रेम’ची निर्मिती केली आहे, असे पंडित प्रमोद मराठे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. मोहन उजगांवकर यांनी केला. कलाकारांचा सत्कार संजय व वर्षा चितळे यांनी केला.
—————————————–
जाहिरात