गोल्डन आय न्यूज नेटवर्क
“धर्म कोणताही असो, भूमिका ही संवादाचीच असावी लागते”
‘काळ्या मातीचं लेकरू’ प्रकाशन समारंभात श्रीपाल सबनीस यांचे मत!
पुणे : ‘‘कोणत्याही धर्मग्रंथाच्या पानापानांमध्ये आपल्याला केवळ मानवी संवादाचीच भाषा आढळून येते, हे कार्यकर्ता कवी श्रीपाद कोंडे यांचे निरीक्षण विचार करायला लावणारे आहे,’’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले. ते श्रीपाद कोंडे-देशमुख लिखित आणि गोल्डनपेज पब्लिकेशन प्रकाशित ‘काळ्या मातीचं लेकरू’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.
त्यावेळी कवितेचे समीक्षण मांडताना ते म्हणाले, “विविधतेने संपन्न असलेल्या भारतासारख्या देशात बहुसांस्कृतिक संचित जमा करत पुढे जाणे हाच योग्य मार्ग आहे आणि तो या कवितासंग्रहात व्यक्त होतो.”डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘‘नास्तिक असो वा आस्तिक दोन्ही विचारधारांमध्ये मानवतावादालाच महत्त्व आहे. वैश्विक परिप्रेक्षातून पाहताना हा मानवतावाद जपण्याची नितांत गरज आहे.
महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर-तुकाराम आदि संतांचीही तीच भूमिका होती आणि कवीने त्याच्या कवितांमधूनही ते सांगितले आहे.मानवी भावना, प्रेम, अध्यात्म, निसर्ग, गाव-माती, नातेबंध अशा सर्व अंगांना स्पर्श करणारी अशी या संग्रहातील कविता आहे.’
’कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक आणि प्रवचनकार डॉ. प्रदीप पाटील म्हणाले की, ‘‘मणिपूरसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आजची सामाजिक परिस्थिती पाहिली तर जिंदाबाद, मुर्दाबाद घोषणा देणारे, दंगल आणि जाळपोळ करणारे आमचे हात निरांजन लावताना मात्र थरथरतात. अशा परिस्थितीत कवीने आजच्या युवकांना केलेले आवाहन क्रांतीकारी ठरते.
‘
काळ्या मातीचं लेकरू’ पुस्तक प्रकाशन समारंभात (डावीकडून) संजना कोंडे-देशमुख, कीर्तनकार संगीता कोंडे-देशमुख, कवी श्रीपाद कोंडे-देशमुख, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रदीप खेतमर, अमृता खेतमर.
तसेच कवीच्या रचना ह्या मनाच्या शुद्धतेची, निर्मळतेची प्रतीके आहेत. अशा रचना सुचतात हेच वेगळेपण या कवीचे आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून साकार केलेली संत जनाई, मुक्ताईची संक्षिप्त जीवनचरित्रे मनाला आल्हाद देऊन जातात.’’मनोगत व्यक्त करताना कवी श्रीपाद कोंडे-देशमुख म्हणाले, की ‘‘या काव्यसंग्रहातील कविता ह्या स्वकेंद्रित नातं, प्रेम, व्यक्त करणार्या, तसेच सामाजिक विषयांना स्पर्श करणार्या आहेत.
त्याचप्रमाणे निसर्गाचं भान जपणाऱ्या आणि भक्तिमार्गी विचार मांडणार्या आहेत. जसं आधी माणसाचं स्वतःचं विश्व, मग समाज आणि त्याचं देणं; त्यानंतर जिचा आपण एक भाग आहोत ती अवघी सृष्टी आणि शेवटी निर्वाणाचा, अनंताचा प्रवास अशी खंडनिहाय विभागणी आहे.’’
गोल्डनपेज पब्लिकेशनचे संपादक प्रदीप खेतमर प्रास्ताविकात म्हणाले की, ‘‘व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये ही बर्याचदा त्याच्या रचनांमध्ये उतरतात. शांती आणि शील जपणारे सामाजिक कवी श्रीपाद कोंडे देशमुख यांच्या कवितेतूनही आपणाला ते जाणवते.”संगीता कोंडे-देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी केले.
जाहिरात