गोल्डन आय न्यूज नेटवर्क –
पुणे : युवा कलाकारांचे सुरेल गायन, देश परदेशातील वाद्यांचा मेळ साधत केलेले दमदार वादन आणि विलोभनीय नृत्याद्वारे आवर्तन गुरुकुल आयोजित तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला दि. 7 जुलै रोजी सुरुवात झाली.
शकुंतला शेट्टी ऑडिटोरियम, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे येथे आवर्तन गुरुकुलातील विद्यार्थ्यांचा गायन-वादन-नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तालयोगी पं. सुरेश तळवलकर, भरतनाट्यम् नृत्यगुरू सुचेता भिडे-चापेकर, पंडित रामदास पळसुले, पंडित निषाद बाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे विश्वस्त शिरीष कौलगुड, अनिता संजीव, श्रीकांत शिरोळकर उपस्थित होते.
नृत्यगुरू सुचेता भिडे-चापेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘नृत्यगंगा’ हा भरतनाट्यम् शैलीतील अनोखा नृत्यप्रकार रसिकांना अनुभवायला मिळाला. भरतनाट्यम् नृत्याची देहबोली आणि उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची साथ याचा उत्तम मेळ साधून ‘नृत्यगंगा’ ही शैली निर्माण करण्यात आली आहे. ‘नाही मी बोलत नाथा’ आणि ‘अरसिक किती हा शेला’ या मराठी नाट्यगीतांवर करण्यात आलेले साभिनय नृत्य सादरीकरण कार्यक्रमातील वेगळेपण ठरले.
नृत्यगुरू सुचेता भिडे-चापेकर यांच्याकडे भरतनाट्यम्चे शिक्षण घेतलेल्या वृषाली चितळे-लेले, मानसी जोग-देशपांडे, मुग्धा असनीकर, वैशाली चंद्रवदन, विकिराज कडले, स्वराली मुळ्ये, प्राजक्ता राजुरकर आणि रमा कुकनूर-कानेटकर यांनी नृत्यप्रस्तुती केली. सावनी श्रीखंडे (गायन), ऋषिकेश जगताप (तबला), स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), कृष्णा साळुंके (पखवाज) यांनी साथसंगत केली तर ऋचा आठवले यांनी निवेदनाद्वारे कथा उलगडत नेली.
दुसऱ्या सत्रात पंडित निषाद बाकरे यांचे शिष्य अथर्व बुरसे आणि ओंकार देऊळगावकर याचे स्वतंत्र गायन झाले. अथर्व बुरसे याने आपल्या गायनाची सुरुवात भिमपलास रागात तिलवाडातील ‘पलकन लागे’ आणि द्रुत तीनतालात ‘ढोलन मेढे घर आवो’ या पारंपरिक बंदिशी सादर केल्या. पार्थ ताराबादकर (तबला) आणि अमेय बिच्चू (संवादिनी) यांनी साथसंगत केली. त्यानंतर ओंकारने आपल्या मैफलीची सुरुवात राग श्रीमधील बडाख्याल तिलवाडातील ‘गजरवा बाजे’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. सादरीकरणाची सांगता छोटा ख्यालमधील तीन तालातील ‘एरी होतो आसन गैली’ या पारंपरिक बंदिशीने केली.
महोत्सवातील पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात गुरू तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्यांनी सादर केलेला ‘तालकीर्तन’ हा देश-परदेशातील वाद्यांचा मेळ साधणारा अनोखा प्रकार अनुभवायला मिळाला. तबला, पखावज या भारतीय तर ड्रम्स, कहोन, कलाबाश, ला ओला, दरबुका, उदू या पाश्चात्य तालवाद्यांचा एकत्रित मेळ साधत ‘तालकीर्तन’ सादर करण्यात आले. सावनी तळवलकर, आशय कुलकर्णी, रोहित खवले, पार्थ भूमकर, अभिषेक भुरूक, ऋतुराज हिंगे, भार्गव देशमुख, वेदांग जोशी, जगमित्रा लिंगाडे, ईशान परांजपे यांचा ‘तालकीर्तन’ या अनोख्या वाद्यवृदांत सहभाग होता.
महोत्सवात शनिवारी (दि. 8) गुरू शमा भाटे यांच्या शिष्यांची कथक नृत्य प्रस्तुती होणार असून दुसऱ्या सत्रात गुरू तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्यांचे पखवाज वादन होणार आहे.
जाहिरात
जाहिरात