गोल्डन आय न्यु नेटवर्क
कथक नृत्य आणि सरोद वादनाचे उलगडले तंत्र !
शिप्रा जोशी, नितीश पुरोहित यांचे विवेचनासह सादरीकरण , आयसीसीआर आणि भारती विद्यापीठातील स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्तर्फे आयोजन !
पुणे : कथक नृत्यातील तत्कार, हस्तमुद्रा, वेशभूषेसह सादरीकरणाचे तंत्र उलगडले तर सरोद या वाद्याची ओळख, गुरू, परंपरा, घराणी यांसह वादनातील वैशिष्ट्ये आज अभ्यासकांसह रसिकांना अनुभवायला मिळाली.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्तर्फे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कथक नृत्यांगना शिप्रा जोशी आणि प्रसिद्ध सरोदवादक नितीश पुरोहित यांनी अनुक्रमे कथक नृत्य आणि सरोद वादनाविषयी अभ्यासपूर्ण विवेचन करून सादरीकरण केले. कार्यक्रम भारती विद्यापीठ, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्, सेमिनार हॉल येथे झाला.
आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्चे संचालक प्रा. शारंगधर साठे, भारती विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या संचालक कीर्ती महाजन, आयसीसीआरच्या सल्लागार कल्याणी सालेकर, कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी उपस्थित होते.
कथक नृत्यशैलीतील भूमी प्रणाम म्हणजे भूमीवर सादरीकरणाआधी संपूर्ण शरणागत होणे या भावाविषयीचे महत्व विशद करून शिप्रा जोशी यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात सरस्वती वंदनेने केली. त्यानंतर 14 मात्रांच्या ताल धमारवर आधारित नृत्यरचना सादर केली. कथक नृत्यशैलीतील हस्तमुद्रा, तत्कारांचे विविध प्रकार, पढंत, ताल याविषयी माहिती देऊन सादरीकरणाची सांगता गुरू गोविंदसिंग यांनी रचलेल्या बंदिशीवर नृत्य सादर करून केली.
नितीश पुरोहित यांनी दृक-श्राव्य माध्यमातून सरोद या वाद्याची ओळख उपस्थितांना करून दिली.
सरोदवाद्याची रचना, त्यातील बारकावे याविषयी माहिती देऊन सरोद या वाद्याशी साधर्म्य सांगणाऱ्या अफगाणी-पेशावरी रबाब, दोतारा, मोहनवीणा, सूरश्रींगार या वाद्यांचा इतिहासही उलगडला. सरोदवादनातील चार घराण्यांविषयी माहिती देत पुरोहित यांनी सरोद वादनातील मींड, पलटा, आंदोलन, जमजमा यांची झलक वादनातून दाखविली. रबाबच्या अंगाने जाणारे वादन दाखविताना पुरोहित यांनी राग तिलक कामोद सादर केला तर ध्रुपद गायकीच्या अंगाने जाणारे वादन चौतालातील राग श्री सादर करून ऐकविले. या नंतर हिमबिहाग रागातील रचना सादर करून कार्यक्रमाची सांगता देश रागातील रचनेने केली.
पुरोहित यांना किशोर कोरडे यांनी तबला साथ केली.
आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार यांनी आयसीसीआरच्या उपक्रमांची माहिती देऊन कलाकारांचा सत्कार केला. संयुक्त उपक्रमांद्वारे देश-विदेशातील विद्यार्थ्यांना माहितीसह कलेचा आस्वाद घेता येईल, असे मत शारंगधर साठे यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन आणि कलाकारांचा परिचय अनुप्रिता लेले यांनी केला तर आभार संजीवनी स्वामी यांनी मानले.
जाहिरात
जाहिरात